जॉब्स

बारावीचा निकाल लागल्यानंतर डीएडला ऍडमिशन घ्यायचे आहे का? वाचा किती आवश्यक आहे बारावीत टक्केवारी आणि किती लागेल शैक्षणिक शुल्क?

Published by
Ajay Patil

21 तारखेला बारावीचा निकाल जाहीर झाला व आता निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांमध्ये कोणत्या कोर्सेसला ऍडमिशन घ्यायचे याकरिता लगबग सुरू होताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामध्ये अनेक कोर्सेस साठी ऍडमिशनची प्रक्रिया  राबवायला सुरुवात होईल व त्यानुसार विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या निवडीनुसार अभ्यासक्रमांना प्रवेश घेतील.

या सगळ्या अभ्यासक्रमांमध्ये डीएड हा देखील एक महत्वपूर्ण अभ्यासक्रम असून येत्या दोन दिवसांमध्ये डीएड प्रवेशाला देखील सुरुवात होणार आहे. डीएडची प्रवेश प्रक्रिया ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून राबवली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना एससीईआरटी म्हणजेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वेबसाईटवरून अर्ज करता येणार आहे.

 किती लागेल शैक्षणिक शुल्क?

त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात डीएड महाविद्यालयांची संख्या वेगवेगळी आहे. सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यात अनुदानित डीएड महाविद्यालय सहा तर खाजगी बावीस महाविद्यालय आहेत. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक होण्याची इच्छा आहे व शैक्षणिक क्षेत्रात करिअर करायचे आहे असे विद्यार्थी त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकणार आहेत.

जर आपण शैक्षणिक शुल्काच्या दृष्टिकोनातून पाहिले तर अनुदानित महाविद्यालयांमध्ये ते तीन हजार रुपये तर खाजगी महाविद्यालयांमध्ये वार्षिक शुल्क 12 ते 20000 पर्यंत आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज करताना महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम निवडणे गरजेचे असून अर्ज करण्याची मुदत जेव्हा संपेल

तेव्हा कागदपत्रांची पडताळणी होईल व टक्केवारीनुसार विद्यार्थ्यांना थेट प्रवेश मिळणार आहे. पहिल्या फेरीमध्ये संबंधित विद्यार्थ्याला कोणते महाविद्यालय मिळाले याचा मेसेज ई-मेलच्या माध्यमातून पाठवला जाणार आहे.

 डीएड प्रवेशासाठी किती गुणांची आहे अट

बारावी नंतर शिक्षक व्हायचे असेल तर डीएड हा उत्तम पर्याय असून डीएड प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 49.50% गुणांची अट असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता 44.50% गुणांची मर्यादा आहे. आपण जर गेल्या काही वर्षांपासून डीएड साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहिली तर ती दिवसेंदिवस कमी होताना दिसून येत आहे.

त्यामुळे उपलब्ध महाविद्यालयांचा ऍडमिशनचा कोटा मोठ्या प्रमाणावर शिल्लक राहत असल्याचे चित्र आहे. एवढेच नाही तर काही महाविद्यालय बंद करण्याची नामुष्की देखील ओढवली आहे. परंतु आता दरवर्षी शिक्षक भरती होत असल्यामुळे यावर्षी डीएडसाठी प्रवेश वाढतील असा विश्वास देखील व्यक्त केला जात आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil