Jobs News : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्याकरिता बिंदूनामावली निश्चित करण्याचे काम सुरू आहे. कर्मचाऱ्यांपासून दुय्यम निबंधकांपर्यंतची पदे भरली जाणार आहेत.
सुमारे ३५० जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. नोंदणी व मुद्रांक निरीक्षक विभागाच्या राज्यातील सर्व जिल्ह्यांतील कार्यालयांमध्ये लिपिकापासून ते दुय्यम निबंधकांपर्यंत अनेक पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहेत. या पदांमुळे लिपिकांकडे दुय्यम निबंधकांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात येत आहे.
त्यामुळे प्रभारी कार्यभार घेतलेल्या लिपिकांसह अधिकाऱ्यांनी दस्तनोंदणी करताना नियमांचे पालन न केल्याचे अनेक प्रकार गेल्या दोन-तीन वर्षांपासून सातत्याने निदर्शनास येत आहेत. त्यातून बेकायदा पद्धतीने दस्तनोंदणी झाल्याची प्रकरणे उघडकीस येऊन संबंधितांवर कारवाईदेखील केली आहे.
काही पदांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार आहे. त्यामुळे या पदांवरील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त होणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गेल्या वर्षी ७८, तर यंदा ४९ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तसेच उर्वरित वर्ग तीन आणि चार ही पदेही भरण्यात येणार आहेत.