भारतामध्ये ज्या काही समस्या आहेत त्यामध्ये बेरोजगारीची समस्या देखील एक उग्र स्वरूप धारण करत असून दिवसेंदिवस बेरोजगारीच्या समस्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसून येत आहे. कारण सुशिक्षित तरुणांच्या तुलनेमध्ये उपलब्ध नोकऱ्यांची संख्या खूप कमी असल्यामुळे या समस्यांनी उग्ररूप धारण केलेले आहे.
त्यामुळे आता बरेच तरुण आणि तरुणी व्यवसायांकडे वळू लागले आहेत. दुसरे महत्त्वाचे म्हणजे जर आपण कामाचे स्वरूप पाहिले तर हा इंटरनेटचा जमाना असल्यामुळे तुम्ही अगदी घरी बसून देखील अनेक वेगळ्या पद्धतीचे कामे करून चांगला पैसा मिळवू शकता.
म्हणजे ज्याला आपण कोरोना कालावधीमध्ये जी काही वर्क फ्रॉम होम हे मॉडेल पुढे आले अगदी त्याच मॉडेलने तुम्ही घरी बसून चांगला पैसा मिळवू शकतात. ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी जाऊन काम करण्यापेक्षा तुम्ही जर घरी बसून चांगला पगार मिळेल अशा कामाच्या शोधात असाल तर या लेखामध्ये आपण काही महत्त्वाचे कामे बघणार आहोत जी कामे तुम्हाला घरी बसून चांगला पैसा मिळवून देतील.
घरी बसून ही कामे करा आणि चांगला पैसा मिळवा
1- डेटा अनालिसिस अर्थात डेटा विश्लेषणातून पैसे कमावण्याची संधी– आज-काल मार्केटमध्ये डेटा विश्लेषणाची मागणीत खूप वाढ झाली असून जर तुम्हाला या कामाबद्दल चांगली माहिती असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करून कोणत्याही कंपनीमध्ये नोकरी मिळवू शकतात.
एवढेच नाही तर तुम्ही एखाद्या चांगल्या नोकरीच्या पर्यायाचा विचार करत असाल तर त्या दृष्टिकोनातून देखील या पर्यायाचा विचार करू शकतात. याकरिता तुम्हाला Coursera वर ऑनलाईन अभ्यासक्रम देखील उपलब्ध आहेत. या साइटवरून तुम्ही काही महिन्यांची ट्रेनिंग घेऊ शकता.
एकदा तुम्ही हे काम शिकले की तुम्ही सहजपणे हे काम करून चांगला पैसा मिळवू शकतात. डेटा विश्लेषकाचे काम करण्याकरिता तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन आणि संगणक किंवा लॅपटॉप असणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे या क्षेत्रात देखील फ्रीलान्स कामाचे पर्याय उपलब्ध आहेत. या कामाच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक तासाला 200 ते 1500 रुपये पर्यंत देखील पैसे मिळवू शकता.
2- फ्रीलान्सिंग रायटिंग– बऱ्याच जणांकडे वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य असते. यापैकी जर तुमच्यामध्ये लेखन कौशल्य असेल तर तुम्ही घरी बसून फ्रीलान्स रायटिंगचे काम करून चांगला पैसा मिळवू शकतात. याकरिता अनेक मीडिया हाऊस आणि इतर कंपन्या तुम्हाला फ्रीलान्सिंग रायटिंग मध्ये संधी उपलब्ध करून देतात.
जर यामध्ये तुम्हाला काम करायची इच्छा असेल तर तुम्ही Upwork आणि Fiverr यावर आपला आयडी तयार करू शकता व तिथून काम सुरू करू शकतात. याठिकाणी तुम्हाला भारता व्यतिरिक्त विदेशातून देखील कामाचे संधी मिळते.
फक्त जर तुम्हाला एखाद्या परदेशी क्लाइंटकडून कामाची संधी मिळाली तर त्याच्याकडून पैसे मिळवण्याकरता तुम्हाला PayPal हे खाते उघडणे गरजेचे असते. या खात्यातून तुम्ही सहजपणे पैसे काढू शकतात. फ्रीलान्स रायटिंगच्या कामातून तुम्ही प्रत्येक महिन्याला 40 ते 50 हजार रुपयापर्यंत देखील कमाई करू शकता.
3- ट्रान्सलेटर अर्थात अनुवादक– समजा तुम्हाला जर एकापेक्षा जास्त भाषा येत असतील किंवा त्या भाषांचे तुम्हाला चांगले ज्ञान असेल तर तुम्ही घरी बसून अनुवादक म्हणून काम करू शकतात. तुम्हाला इंग्रजी आणि हिंदी चांगली येत असेल तर तुम्ही Upwork किंवा कोणत्याही संस्थेत सहभाग घेऊन हिंदी ते इंग्रजी किंवा इंग्रजी ते हिंदी असे भाषांतराचे काम करून पैसे मिळू शकतात.
हे काम करून तुम्ही सरासरी एक ते दोन रुपये प्रतिशब्द अशा दराने पैसे मिळवू शकतात. जर ही आकडेवारी पाहिली तर तुम्ही प्रत्येक दिवसाला 1000 शब्द देखील भाषांतरित केले तरी तुम्हाला प्रत्येक महिन्याला तीस हजार रुपये कमाई होऊ शकते.