Kanda Bajarbhav : कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. कांदा दरात आता मोठी वाढ झाली आहे. खरं पाहता, गेल्या महिन्यात कांद्याला अतिशय कवडीमोल बाजार भाव मिळत होता. मात्र आता बाजारात कांद्याची आवक कमी झाली असल्याने कांदा बाजार भावात वाढ होत आहे.

पंधरा रुपये प्रति किलोपर्यंत विक्री होणारा कांदा आता चार हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री होत आहे. दरम्यान जाणकार लोकांनी कांद्याचे बाजार भाव अजून काही काळ कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. मित्रांनो खरं पाहता बाजारात अजून नवीन लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झालेली नाही.

शेतकरी बांधवांनी साठवलेला गेल्या हंगामातील उन्हाळी कांदा देखील आता संपत आला आहे. विशेष म्हणजे कांदा चाळीत साठवलेला उन्हाळी कांदा आता हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणात सडला आहे. शिवाय जास्त काळ साठवला असल्याने कांद्याचे वजन कमी होत आहे.

शेतकरी बांधवांच्या मते त्यांनी कांदा चाळीत जर तीन ट्रॅक्टर कांदा साठवला असेल तर आता त्यांना केवळ दीड ट्रॅक्टर कांदा मिळत आहे. म्हणजेच त्यांना निम्म्याहुन अधिक घट बसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

तसेच शेतकरी बांधवांनी गत पाच महिने कांदा अतिशय कमी बाजारभावात विकला असल्याने आता शेतकऱ्यांजवळचा कांदा संपत असताना वाढलेला हा बाजारभाव शेतकऱ्यांच्या काय कामाचा हा मोठा प्रश्न शेतकरी बांधव उपस्थित करत आहेत.

सहाजिकच आता झालेली ही दरवाढ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी निरुपयोगी ठरत असून या दरवाढीचा फायदा बोटावर मोजण्या इतक्याच शेतकऱ्यांना होत आहे. आज झालेल्या लिलावात कांदा 3500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत विक्री झाला आहे.

आज कांद्याला 1450 रुपये प्रति क्विंटल ते 3 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे. दरम्यान जाणकार लोकांनी कांदा किरकोळ बाजारात 50 रुपये प्रति किलोपर्यंत विक्री होणार असल्याचे सांगितले आहे.

यामुळे घाऊक बाजारात देखील कांद्याच्या किमती वाढणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या बाजारात नवीन लाल कांदा विक्रीसाठी येत नसल्याने आणि डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत नवीन लाल कांदा बाजारात दाखल होणार नसल्याने कांदा दरात झालेली ही वाढ जानेवारी महिन्यापर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज व्यापारी लोकांनी वर्तवला आहे.

निश्चितच या वाढलेला दराचा किती शेतकऱ्यांना फायदा होतो ही तर एक विश्लेषणात्मक बाब राहणार आहे. मात्र सध्या वाढलेले कांदा बाजार भाव शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव आणत आहेत.