Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील गावांमध्ये यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने रब्बी हंगामातील पिकांवर मोठा परिणाम होणार आहे. या भागात लवकरच दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना जाणवणार असल्याने शेतकरी रब्बी हंगामात कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांवर भर देणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
धरणाची पाणीसाठा स्थिती सध्या चांगली असली, तरी जायकवाडीला पाणी जाण्याच्या धास्तीने या भागात शेतकरी हवालदिल झाला आहे. वरील धरणातून नेमके किती टीएमसी पाणी जाणार आणि यंदाच्या वर्षी शेतीसाठी किती आवर्तन राहणार याचा काहीच भरवसा नसल्याने दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकरी चिंतेत दिसत आहेत.
शेती आवर्तन पाण्याच्या भरोसा नसल्याने मात्र या भागात ऊस लागवडीला शेतकरी धास्तावले आहे. सतत बदलते हवामान व पाण्याची खात्री नसल्याने गहू पेरणी घरच्यापुरतीच राहील आणि त्या पाठोपाठ हरबरा, ज्वारी व पशुसंवर्धनाचा चारा ही पिके या दिसून येतील.
भागात जायकवाडीला पाणी जातेवेळेस परिसरातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पूर्ण क्षमतेने भरून मिळतील की नाही? याचा सुद्धा भरोसा राहिला नाही. त्यामुळे बंधाऱ्याच्या पाण्याच्या शाश्वतीवर शेतकरी अवलंबून राहिला तयार नाही.
त्यामुळे कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांवर भर देऊन रब्बी हंगाम पूर्ण करण्यासाठी शेतकरी तत्परतेने दिसून येत आहे. मोजक्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे व पुढे असणार आहे. त्यामुळे शेतकरी कांदा पिकावर भर देऊन एकप्रकारे लॉटरी खेळताना दिसणार आहे.
अलीकडच्या पंचवीस-तीस वर्षांत कधी नव्हे तो पावसाचा निच्चांक तालुक्यात झाला आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात फक्त हजेरी लावणारा पाऊस तब्बल तीन महिन्यांनंतर झाला.
नेवासा तालुक्यातील अनेक गावात ओढे, नाले व नद्यांना पाणी वाहिले नाही. परिणामी विहीर व कूपनलिकांच्या पाण्याची पातळी खालवली आहे आणि भवितव्य अंधारमर असून दुष्काळला सामोरे जाण्याची भीती शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे.
आवर्तनाचा आराखडा जाहीर करावा
आधीच तालुक्यातील शेतकऱ्यांना सतत पावसाचे अनुदानाच्या रकमेपासून बरेसे शेतकरी वंचित आहे. त्यात सध्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने 25 टक्के आगाऊ रक्कम जाहीर केली. पण अजून ती रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा नाही.
अशा परिस्थिती पुन्हा शेतकऱ्यांना दुष्काळाच्या संकट ओढणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. भविष्यात वरील धरणातून शेती आवर्तन किती व केव्हा मिळणार हे शेतकऱ्यांना जलसंपदा विभागाने सांगावे जेणेकरून शेतकरी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी व लागवडी करतील.