Black Wheat : लाल गहू सगळ्यांना माहित आहे; पण काळा गह म्हटलं तर सर्वांनाच नवल वाटेल. शेतीत नेहमीच वेगळा प्रयोग करणारे अकोले तालुक्यातील टाकळी येथील प्रसन्ना धोंगडे या शेतकऱ्याने काळ्या गव्हाचे उत्पन्न घेत नवीन प्रयोग केला आहे.
भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. शेतकरी सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतात. तसेच पारंपरिक पिकांना बगल देत पीक पद्धतीत बदल करीत असतात. असाच एक प्रयोग अकोले तालुक्यातील टाकळी येथील शेतकरी प्रसन्ना धोंगडे यांनी केला व काळ्या गव्हाचे उत्पन्न घेतले आहे. आपल्याला लाल गहू माहित आहे, त्याच्या वेगवेगळ्या जाती, वाण माहित आहे; पण काळा गहू आणि त्याचे उत्पन्न घेणारे शेतकरी दुर्मिळच.
घोंगडे यांच्या आई वडिलांना ब्लड प्रेशर व शुगरचा त्रास होत असल्याने त्यांनी काळा गहू शरीरासाठी चांगला असतो, असे त्यांना गुगलवर वाचायला मिळाले. काळ्या गव्हाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. काळा गव्हाचे बियाणे कोठे मिळते, याचा शोध घेतला. उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे राहात असलेल्या आपल्या मित्रामार्फत त्यांनी पंजाबमधून पाच किलो काळ्या गव्हाचे बियाणे आणले.
त्याची त्यांनी आपल्या शेतात दोन गुंठ्यांत लागवड केली. त्यामध्ये त्यांना काळ्या गव्हाचे ४० ते ४५ किलो उत्पादन मिळाले. सध्या काळ्या गव्हाला किलोमागे ७० रुपये भाव मिळतो. त्याची चव इतर गव्हासारखीच असते. काळ्या गव्हाची लागवड प्रामुख्याने मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये केली जाते.
काळ्या गव्हामध्ये सामान्य गव्हापेक्षा ६० टक्के जास्त लोह असते. गव्हाचा काळा रंग त्यामध्ये असलेल्या अँथोसायनिन नावाच्या रंगद्रव्यामुळे होतो. या जातीमध्ये अँटिऑक्सिडंट घटक आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात, तथापि काळ्या गव्हाचे पौष्टिक फायदे लक्षात घेता ते अजूनही कमी किमतीत उपलब्ध आहे. भविष्यात ते अधिक महाग मिळण्याची शक्यता आहे.
काळ्या गव्हाचे फायदे
काळ्या गव्हामध्ये प्रथिनांचे प्रमाण, आहारातील फायबर, कॅल्शियम, व्हिटॅमिन के, फ्लेव्होनॉइड (टीएफसी) आणि फिनोलिक सामग्री (टीपीसी) ऑँटिऑक्सिडंट क्रिया पारंपरिक पिवळ्या गव्हापेक्षा जास्त असते. हा गहू हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, जळजळ, कर्करोग, मधुमेह आणि लठ्ठपणापासून संरक्षण करतो. फायबर कर्करोग, लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात.
अँथोसायनिन रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
काळ्या गव्हात अँथोसायनिन असते. जे एक अँटिऑक्सिडेंट आहे. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. ब्लूबैरी आणि जांभूळ या फळांमध्ये अँथोसायनिनचे प्रमाण जास्त असते; परंतु ही फळे वर्षभर उपलब्ध नसतात. काळा गहू आपल्या दैनंदिन आहारात पोषक तत्वांचा सहज सोत प्रदान करतो.
गर्ग यांचे संशाधन
नॅशनल अॅग्री फूड बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट मोहाली येथील शाखज्ञ मोनिका गर्ग यांनी सात वर्षांच्या संशोधनानंतर काळा गहू शोधला. भारतीय कृषी संशोधन परिषदेने याला मारू गहू असे नाव दिले, तर राष्ट्रीय कृषी आणि अन्न जैवतंत्रज्ञान संस्थेने नबी एम. जी. नाव दिले.
नवी क्रांती ठरण्याची शक्यता
काळा गहू ही कृषी क्षेत्रात नवी कांती ठरू शकते. याचे असंख्य पौष्टिक फायदे आहेत आणि ते सामान्य गव्हासारखे पीक घेतले जाऊ शकते. शेतकऱ्यांनी या पिकाचे प्रयोग करून वैयक्तिक पातळीवर बियाणे मागवावे. सामान्य गव्हाच्या तुलनेत, काळ्या गव्हाला पेरणीसाठी कमी जागा लागते. योग्य मार्केटिंग आणि जागरुकतेमुळे काळा गहू शेतकऱ्याऱ्यांसाठी फायदेशीर पीक ठरू शकतो आणि ग्राहकांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकतो.