शेतीमध्ये वेगवेगळ्या पिकांची लागवड करून आणि त्या पिकांच्या लागवडीला अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाची जोड आणि बाजारपेठेचा अभ्यास इत्यादी गोष्टींच्या आधारे शेतकरी आता शेतीमधून खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न मिळवत आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पिकांना असलेल्या मागणीच्या संदर्भात जर बघितले तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील
शेतकऱ्यांनी मागणीच्या अनुषंगाने अनेक पिकांची आणि त्यांच्यापासून बनवण्यात आलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्यात करण्यावर भर दिलेला आहे. आता आपण भाजीपाला पिके किंवा फळ पिके मोठ्या प्रमाणावर लागवड करताना शेतकऱ्यांना बघतो. अगदी याच प्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील डोणगाव इथले आनंद शेटे या शेतकऱ्याने मात्र कढीपत्ता लागवडीतून लाखो रुपये कमावण्याची किमया साध्य केली आहे.
कढीपत्ता लागवडीतून आनंद शेटे कमावतात वर्षाला तीन ते चार लाख
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोलापूर पासून दहा किलोमीटर अंतरावर डोणगाव हे गाव असून या ठिकाणी आनंद शेटे हे राहतात. ते शेतीमध्ये वेगवेगळ्या कल्पना आणि प्रयोग राबवण्यासाठी खास करून ओळखले जातात. त्याच प्रयोगाचा भाग म्हणून त्यांनी कडीपत्ता लागवड करण्याचे ठरवले व तीन एकर क्षेत्रावर कढीपत्त्याची लागवड केली व त्याची वार्षिक कमाई आज लाखो रुपयात होत आहे.
साधारणपणे दहा वर्षापासून ते कढीपत्त्याची लागवड करत असून वर्षातून तीन वेळा त्याची छाटणी करून ते विक्री करतात. जर आपण कढीपत्ता लागवडीचे नियोजन पाहिले तर त्यांनी लागवड करण्याआधी जमिनीमध्ये खत टाकले व चांगली मशागत केली व ह्या गोष्टी कडीपत्ता लागवडी आधी करणे खूप गरजेचे असते.
जर आपण कढीपत्त्यावर किडनियंत्रणासाठीच्या फवारण्या बघितल्या तर आठ दिवसातून एकदा कढीपत्त्याचे पिकावर फवारणी करावी लागते व यामध्ये खास करून बुरशीनाशक व कीटकनाशकांचा समावेश केला जातो.
एकदा कढीपत्त्याची लागवड केली की तुम्हाला वर्षभर त्यापासून कुठल्याही प्रकारचे उत्पादन मिळत नाही. परंतु एकदाचे उत्पादन मिळायला लागले की ते दहा वर्षापर्यंत मिळत राहते व त्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न देखील चांगले मिळते.
कसे आहे कढीपत्त्याचे आर्थिक गणित?
आनंद शेटे यांनी तीन एकर बागेमध्ये कढीपत्त्याची लागवड केली आहे व दर चार महिन्यांनी ते कढीपत्त्याची छाटणी करतात. जर आपण कढीपत्त्याचे दर पाहिले तर ते वेगवेगळे असून कधी पन्नास रुपये तर कधी 40 तर कधी 35 रुपये पर्यंत देखील दर मिळतो व या सगळ्या बाजारभावाच्या माध्यमातून त्यांनी वर्षाला तीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.
कढीपत्त्याला मशागत जास्त करावी लागते व त्यामुळे बरेच शेतकरी त्याची लागवड करत नाहीत. कढीपत्ता लागवडीतून कष्ट घेतले तर जास्तीत जास्त उत्पन्न मिळणे शक्य असल्याचे देखील शेतकरी आनंद शेटे यांनी म्हटले आहे.