Bitter Gourd Variety:- कुठल्याही पिकापासून जर तुम्हाला भरघोस उत्पादन हवे असेल तर व्यवस्थापन खूप महत्त्वाचे असते. यामध्ये पाणी व्यवस्थापनापासून तर खत व्यवस्थापन तसेच कीड व रोग नियंत्रणासाठी फवारणी व्यवस्थापन हे अत्यंत आवश्यक असतेच व महत्त्वाचे म्हणजे ते वेळेत होणे गरजेचे असते.
व्यवस्थापन जर योग्य असेल तर मात्र कुठल्याही पिकापासून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळते. परंतु या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचे असेल ते म्हणजे लागवडीकरिता वापरण्यात येणारे बियाण्याचा दर्जा होय. बियाणे किंवा वाण जर दर्जेदार उत्पादन देणारा असेल तर शेतकऱ्यांना यामुळे फायदा होतो.
नाहीतर तुम्ही व्यवस्थापन कितीतरी चोख ठेवले आणि वाण निवडताना जर चूक झाली तर उत्पादनाला फार मोठा फटका बसतो व आर्थिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना देखील खूप नुकसान होते. त्यामुळे कुठल्याही पिकाच्या लागवडीकरिता सुधारित व दर्जेदार अशा वाणांची निवड करणे खूप गरजेचे असते.
अगदी याच प्रमाणे वेलवर्गीय पिकांमध्ये अतिशय महत्त्वाचे असे असलेले कारले लागवड शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची ठरते. कारण कारले लागवडीतून कमीत कमी वेळेमध्ये अधिक उत्पन्न आणि नफा शेतकऱ्यांना मिळतो.
कारले लागवडीतून जर भरघोस उत्पादन हवे असेल तर त्याकरिता देखील तुम्हाला चांगल्या वानांची लागवड करणे गरजेचे असते. त्यामुळे या लेखात आपण कारले पिकाच्या काही महत्त्वपूर्ण असे वानांची माहिती थोडक्यात घेणार आहोत.
कारले लागवडीत फायद्याच्या आणि भरपूर उत्पादन देणाऱ्या व्हरायटी
1- हिरकणी- कारल्याची ही जात दर्जेदार व उत्तम उत्पादनक्षम असून या जातीचे फळे गडद हिरव्या रंगाचे असतात व साधारणपणे 15 ते 20 सेंटीमीटर लांब असतात.
साधारणपणे हिरकणी जातीचे फळ हे काटेरी व लांब असते. उत्पादनासाठी ही जात सरस असून एका हेक्टरमध्ये साधारणपणे सरासरी 130 क्विंटल उत्पादन मिळवणे शक्य होते.
2- फुले ग्रीन गोल्ड- फुले ग्रीन गोल्ड ही कारल्याची उच्च उत्पादनक्षम अशी व्हरायटी असून या जातीचे फळे गडद हिरव्या रंगाचे असतात. फळाची लांबी 25 ते 30 सेंटीमीटर असते व ते काटेरी असतात. फुले ग्रीन गोल्ड जातीच्या कारल्यापासून हेक्टरी 230 क्विंटल उत्पादन मिळू शकते.
3- फुले प्रियांका- ही कारल्याची संकरित जात असून उच्च उत्पादनक्षम अशी व्हरायटी आहे. या जातीचे कारले 20 सेंटीमीटर लांब व भरपूर काटेरी अशा प्रकारचे असते. फुले प्रियांका ही कारल्याची जात जर लागवड करायची असेल तर तुम्ही उन्हाळी किंवा खरीप हंगामात लागवड करू शकतात व त्याकरिता ती योग्य आहे.
विशेष म्हणजे कारल्यावर येणाऱ्या केवडा रोगास ही जात बळी पडत नाही. उत्पादन जर बघितले तर सरासरी फुले प्रियंका या जातीचे हेक्टरी दोनशे क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.
4- कोकण तारा- कोकण तारा ही कारल्याची जात देखील लागवडीसाठी खूप महत्त्वाची आणि चांगली उत्पादनक्षम आहे. या जातीचे कारले काटेरी व 15 सेंटीमीटर लांबीचे असतात.
तसेच फळे हे दोन्ही टोकाला निमुळती व मध्यभागी फुगीर दिसतात. कारल्याची निर्यात करायची असेल तर कोकण तारा जातीची लागवड फायदेशीर ठरू शकते. कोकण तारा जातीच्या लागवडीपासून सरासरी हेक्टरी दीडशे ते दोनशे क्विंटल उत्पादन मिळते.