कृषी

अबब बटाटा चाळीस रुपये किलो ! लगीनसराई, उन्हाळी वाळवणाचे बजेट कोलमडले

Published by
Ahmednagarlive24 Office

महागाईने अतिशय उच्चांक केला आहे असे बोल आपण बहुतांश लोकांच्या तोंडून ऐकतो. या महागाईमध्ये पेट्रोल असो की अगदी घरातील भाजीपाला असो. सध्या भाजीपाल्याच्या किमतीही वाढत आहेत.

बऱ्याच भाजीपाल्याचे दर एकीकडे कमी होत असतानाच आता गरिबांची भाजी म्हणून ओळख असलेल्या बटाट्याचे भाव मात्र आता गगनाला भिडले आहेत. अनेक भागातील आठवडे बाजारात बटाटा ४० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात असल्याचे चित्र आहे.

त्यामुळे आता गृहिणींचा बजेट बिघडले आहे. त्यात उन्हाळा सुरु असल्याने उन्हाळी कामासाठी लागणारा बटाटा महागल्याने या कामातही महिला आखडता हात घेताना दिसत आहेत. आवक घटल्याने बटाट्याच्या भावाने उसळी घेतली. इतर भाजीपाला मात्र स्वस्त दराने विकला जात आहे.

स्वयंपाकघरात कांदा, बटाटा, लसूण आवश्यक असतो. याशिवाय स्वयंपाक पूर्ण होऊ शकत नाही. विविध राज्यांतून येणाऱ्या बटाट्याची आवक घटल्याने याचा परिणाम किमतींवर झालेले असून किमती ४० रुपये पर्यंत गेल्या आहेत.

आवक घटल्याचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी बदलत्या वातावरणाचा फटका बटाट्याच्या पिकाला बसल्यामुळे उत्पन्न कमी झाले. याचा परिणाम आवक घटल्यावर झाला असा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

लगीनसराई, उन्हाळी वाळवणात बटाट्याचा वापर
सध्या मोठ्या प्रमाणात लग्नसराई सुरू झाली. त्यात बटाट्याची आवक कमी असल्यामुळे बटाट्याची भाव वाढले आहेत. एरवी जास्तीत जास्त १५ ते २० प्रतिकिलो विकणारा बटाटा ४० रुपये दराने विकला जात आहे.

सध्या उन्हाळ्यात वाळवणात बटाटा चिप्स, बटाट्याचा किस, बटाटा पापड, बटाटा मिरगुंड आदी पदार्थ बनविण्यासाठी बटाट्याला मोठी मागणी आहे; मात्र ऐन मोसमात बटाटा महाग झाल्याने गृहिणींनी वाळवणासाठीचा आपला हात आखडता घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

ग्राहक चिंतेत तर शेतकऱ्यांना काहीसा दिलासा
दरम्यान ग्राहकांनी वाढत्या भावाबद्दल नाराजगी व्यक्त केली असून महागाईमुळे आधीच हैराण झालेलो असताना बटाटेही महाग झाल्याने कोणती भाजी करावी हा प्रश्न समोर उभा राहतोय. शेतकऱ्यांना फायदा होत आहे

, हे मान्य असले तरीही सामान्य गृहिणींचे बजेट कोलमडले असल्याचे ग्राहक म्हणत आहेत. दरम्यान दुसरीकडे मात्र ज्या शेतकऱ्यांकडे बटाटा आहे ते शेतकरी मात्र आर्थिक फायदा होत असल्याने समाधानी आहेत.

 

 

Ahmednagarlive24 Office