अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात कोरोनाच्या संकटमय काळात शेतकऱ्यांनी पोटच्या पोराप्रमाणे पिकांना जपले मात्र एकामागून एक संकटांचे सत्र कायमच आहे. नुकतेच उसाच्या पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.
यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. राहुरी तालुक्यातील टाकळीमिया परिसरात ऊस पिकावर हुमणी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन सुमारे 80 ते 90 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
त्यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने याची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
अशा पद्धतीने होते उसाचे नुकसान…
हुमणी अळी सुरवातीच्या लहान अवस्थेत असताना तिला खाण्यास पोषक वातावरण तयार होऊन तिची जमिनीत वाढ होते. तशी ती उसाच्या मुळ्या कुरतडून खाते. त्यामुळे उसाची पाने पिवळी पडू लागतात व नंतर सुकू लागतात.
नंतर उसाचे बेटच कोलमडते. अशाप्रकारे उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. दरम्यान हुमणी रोगाने ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने
शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेले आहेत. शासनाने याची दखल घेऊन तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.