उच्च शिक्षण करून नोकरी मिळेल ही आता जवळपास अशक्यप्राय गोष्ट झालेली आहे.लाखोंच्या संख्येने उच्चशिक्षित तरुण आता बेरोजगार असून रोजगारासाठी पडेल ते काम करण्याची वेळ तरुणांवर आलेली आहे. त्यामुळे बहुसंख्य तरुण हे आता व्यवसायांच्या शोधात असून अनेक लहान-मोठे व्यवसायातून बरेच तरुण उदरनिर्वाह करताना आपल्याला दिसून येत आहेत.
त्यातल्या त्यात जर ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातून बघितले तर अनेक शेतकरी कुटुंबामध्ये देखील बहुसंख्य तरुण हे उच्चशिक्षित आहेत व ते नोकरी न मिळाल्याने आता शेतीकडे वळले आहेत. परंतु उच्चशिक्षित तरुण आता शेतीकडे वळले आणि मात्र शेती क्षेत्राचे देखील रूपडे पालटले आहे.
कारण या तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीतून शेती क्षेत्राचेच नाही तर स्वतःच्या देखील आयुष्यात मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणण्यास सुरुवात केलेली आहे.याच मुद्द्याला धरून जर आपण नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात असलेल्या पांगरी या गावचे लालबा जाधव या तरुण शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले व इतकेच नाही तर डीएड आणि बीएड देखील पूर्ण केले.
त्यानंतर मात्र नोकरीसाठी दोन वर्ष वाया घालवले पण नोकरी मिळाली नाही.शेवटी नोकरी शोधणे थांबवले व शेती करण्याचा निर्धार करून काहीतरी वेगळा प्रयोग करावा या उद्देशाने घरच्या बारा एकर जमिनीपैकी तीन एकरमध्ये पपई लागवड करण्याचे निश्चित केले.
लालबा जाधव यांनी पपई लागवडीतून मिळवले पंधरा लाख उत्पन्न
लालबा जाधव हे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात असलेल्या पांगरी गावचे रहिवासी असून त्यांनी डीएड, बीएड आणि पदवी पर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे व नोकरी न मिळाल्याने त्यांनी शेती करण्याचे ठरवले. यामध्ये काहीतरी नवीन करावे म्हणून त्यांनी बारा एकर क्षेत्रापैकी तीन एकरमध्ये पपई लागवड करण्याचा निर्णय घेतला व पपई लागवड केली.
या पपई लागवडीतून त्यांना तब्बल 13 ते 15 लाख रुपयांचे उत्पन्न ते आता मिळवत आहेत. पपई लागवड करण्याकरिता त्यांनी नगर जिल्ह्यातून जवळपास 2700 विकत आणली व त्यांची लागवड केली. सध्या पपईला बाजारभाव चांगला मिळत असून तो 15 ते 16 रुपये इतका दर मिळत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
पपई लागवडी सोबत केले हळद, केळी आणि सोयाबीन पिकाचे नियोजन
लालबा जाधव यांची एकूण बारा एकर जमीन आहे व त्यांनी तीन एकर पपई लावली असून बाकीच्या शेतामध्ये केळी, हळद आणि सोयाबीनची लागवड केली असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तम व्यवस्थापनाने त्यांनी भरघोस उत्पन्न या पिकांपासून देखील मिळवून आर्थिक प्रगती साधण्यात यश मिळवलेले आहे. एकट्या पपईने त्यांना वर्षाकाठी 15 लाख रुपयांचे उत्पन्न देण्यामध्ये मदत केलेली आहे.
अशाप्रकारे लालबा जाधव यांच्या उदाहरणावरून आपल्याला शिकायला मिळते की उच्च शिक्षण घेऊन त्याचा उपयोग नुसता नोकरीत न करता जर तुम्ही इतर क्षेत्रात देखील केला व कष्ट आणि सातत्याच्या जोरावर जर वाटचाल सुरू ठेवली तर यश हमखास मिळते हे दिसून येते.