Agri Related Business Idea:- तुम्हाला देखील नोकरी नाही व तुम्ही व्यवसायाच्या शोधात असाल व आता सध्या शेती व्यवसाय करत असाल तर शेती करत असताना तुम्ही सरकारच्या मदतीने दुसऱ्या एका व्यवसायात पाऊल ठेवून त्या माध्यमातून चांगला पैसा कमवू शकतात व स्वतः आर्थिक समृद्ध होऊ शकतात.
शेतीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान आल्याने आता शेतीत खूप मोठा बदल घडून येताना आपल्याला दिसून येत आहे. त्या अनुषंगाने शेतीशी निगडित असलेले अनेक व्यवसाय निर्माण होऊ लागल्याने त्या माध्यमातून रोजगाराच्या संधी देखील निर्माण झालेले आहेत.
शेती व्यवसायातून जर भरघोस उत्पादन हवे असेल तर याकरिता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेतातील मातीचे आरोग्य कसे आहे हे तुम्हाला समजणे खूप गरजेचे असते व या दृष्टिकोनातून माती तपासणी केंद्र प्रत्येक गावात सुरू होणे खूप गरजेचे आहे.
या माध्यमातून उत्पन्नाचे साधन आणि रोजगार उपलब्ध होण्यास देखील मदत होईल व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील माती किती आरोग्यदायी अर्थात कसदार आहे हे समजेल व त्या दृष्टिकोनातून खत नियोजन करता येईल.
या सरकारी योजनेतून सुरू करा स्वतःचे माती तपासणी केंद्र
केंद्र सरकारच्या माध्यमातून 2015 यावर्षी सॉईल हेल्थ कार्ड नावाची योजना सुरू केली होती. या योजनेचा प्रमुख उद्देश होता की गावागावांमध्ये माती परीक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे हा होय.
या योजनेच्या माध्यमातून गावामध्ये माती परीक्षण केंद्र सुरू करण्यासाठी जो एकूण खर्च येतो त्यापैकी 75 टक्के खर्च सरकारकडून मिळतो व या योजनेच्या माध्यमातून माती परीक्षण केंद्र सुरू करता येऊ शकते. दुसरे म्हणजे तुम्ही एखाद्या वाहनावर माती परीक्षणासाठी लागणारी आवश्यक उपकरणे ठेवून गावागावात जाऊन माती परीक्षण सेवा शेतकऱ्यांना देऊ शकतात.
कुणाला मिळतो या योजनेचा लाभ?
1- केंद्र सरकारच्या सॉईल हेल्थ कार्ड योजनेच्या लाभ घ्यायचा असेल तर वयोमर्यादा ही 18 ते 40 दरम्यान असणे गरजेचे आहे.
2- तसेच उमेदवार हा किमान दहावी उत्तीर्ण असावा.
3- उमेदवाराला ॲग्री क्लिनिक सोबतच शेतीची चांगली माहिती असणे गरजेचे आहे.
4- उमेदवार हा शेतकरी कुटुंबातील असला तर प्राधान्य देण्यात येते.
5- गावामध्ये माती परीक्षण केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हा कृषी कार्यालयामध्ये जाऊन संपर्क साधून पुढील प्रक्रिया करता येते.
6- माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्याकरिता तुमच्याकडे जागा असणे आवश्यक आहे. स्वतःच्या किंवा भाडोत्री घर असले तरी चालते.
7- तुम्हाला जर वाहनात माती परीक्षण केंद्र सुरू करायचे असेल तर त्या पद्धतीने वाहन असणे गरजेचे असते.
या योजनेचा लाभ कसा घ्याल?
केंद्र सरकारच्या सॉयल हेल्थ कार्ड योजनेच्या माध्यमातून तुम्हाला माती परीक्षण केंद्र सुरू करायचे असेल तर त्याकरिता सगळ्यात अगोदर soilhealth.dac.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल व या ठिकाणी तुम्हाला या योजनेची अधिकची माहिती मिळते.
याकरिता तुम्हाला आवश्यक अर्ज कृषी अधिकाऱ्यांकडून घ्यावा लागतो व तो व्यवस्थित भरावा लागतो. तसेच लागणारे आवश्यक कागदपत्र अर्जासोबत जोडावी लागतात व हा अर्ज कृषी विभागात जमा करावा लागतो. या व्यतिरिक्त तुम्ही किसान कॉल सेंटरच्या 1800-180-1551 या टोल फ्री क्रमांक वर संपर्क साधून अधिकची माहिती घेऊ शकता.
माती परीक्षण प्रयोगशाळा किंवा केंद्र सुरू करण्यासाठी किती खर्च येतो व सरकार किती पैसे देते?
केंद्र सरकारच्या सॉईल हेल्थ कार्ड योजनेच्या माध्यमातून माती परीक्षण प्रयोगशाळा अथवा केंद्र सुरू करण्याकरिता साडेचार लाख ते पाच लाख रुपये पर्यंत खर्च येण्याची शक्यता आहे.
परंतु केंद्र सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून एकूण खर्चाच्या 75 टक्के रक्कम केंद्र सरकार देते. साधारणपणे यामध्ये तीन लाख 75 हजार रुपयांपर्यंतचा खर्च सरकार देते व तुम्हाला एक लाख 25 हजार रुपये स्वतः गुंतवावे लागतात.