Agricultural News :- शासनाने भाजीपाल्यासह सर्व पिकांना हमीभाव जाहीर करावा तसेच टोमॅटोलाही कांद्याप्रमाणे अनुदान मिळावे अशी मागणी टोमॅटोचे दर कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी केली आहे.
श्री. भद्रे पुढे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी आवक घटल्यामुळे टोमॅटोचे उत्पन्न कमी प्रमाणात निघाले. यामुळे टोमॅटो दोनशे रुपये किलोपर्यंत गेला. अर्थात सर्रास टोमॅटो दोनशे रुपये किलोप्रमाणे विक्री झाला नाही. जो छोट्या आकाराचा, पिवळसर रंगाचा, निकृष्ट दर्जाचा टोमॅटो होता त्याची किंमत खूपच कमी होती.
मात्र शासनापर्यंत टोमॅटोचा दोनशे रुपये किलो प्रमाणेचा भाव गेल्यानंतर शासनाने ग्राहकांच्या हितासाठी नेपाळमधून टोमॅटो आयात केला. यापूर्वी शासन भाजीपाला नाशवंत असल्यामुळे तसेच लांब वाहतुकीसाठी व टिकविण्यासाठी परवडत नसल्यामुळे हमीभाव देता येणार नाही असे सांगत होते.
परंतु जर नेपाळमधुन टोमॅटो आणला जाऊ शकतो आणि टिकतो तर टोमॅटोसह सर्वच भाजीपाल्याच्या पिकांना हमीभाव द्यायला काहीच हरकत नसल्याचे मत भद्रे यांनी व्यक्त केले आहे.
सध्या टोमॅटो उत्पादकांना दोन रुपये ते पाच रुपये किलोप्रमाणे टोमॅटो विकण्याची वेळ आली असल्यामुळे शासनाने टोमॅटोसह सर्वच भाजीपाला पिकांना हमीभाव द्यावा तसेच कांद्याप्रमाणेच टोमॅटो उत्पादकांनाही शासनाने अनुदान देऊन आधार द्यावा
अशी मागणी ज्येष्ठ विधीज्ञ कारभारी गवळी, भारतीय जनसंस्थेचे अध्यक्ष अशोक सब्बन, विलास खांदवे, वीरबहादूर प्रजापती, गणेश इंगळे, सुनील टाक, बबलू खोसला, भगवान जगताप व जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी केली आहे.