Sugarcane Farming : ऊस शेती बरोबरच इतर पिके घेत असतानाच प्रत्येक शेतकऱ्याने आता भविष्य काळात शेती सुधारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञाना बरोबर सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करूनच शेती सुधारावी असा मौलिक सल्ला ज्येष्ठ शेतीतज्ञ राजेंद्र पवार यांनी ऊस शेती परिसंवाद कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
सहकार महर्षी नागवडे कारखाना कार्यस्थळावर नागवडे कारखाना परिसरात ऊस पिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे होते. प्रमुख उपस्थितांमध्ये कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, डॉ. हेमांगी जांभेकर, दीपकराव सपकाळ, भूषण जांभेकर, यांच्यासह कारखान्याचे आजी-माजी संचालक कार्यकारी संचालक रमाकांत नाईक शेतकी अधिकारी एस. बी. कुताळ, भोजन मॅनेजर डी. एम तावरे, ऊस विकास अधिकारी प्रसाद भोसले, इंजिनिअर मधुकर जगताप यांच्यासह सर्व खाते प्रमुख, सभासद, ऊस उत्पादक आदी उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र पवार पुढे म्हणाले की, श्रीगोंदा तालुका हा ७५ टक्के सिंचन क्षेत्रा खाली मोडतो. सिंचनाबाबत तालुक्यात चांगले काम झालेले आहे. परंतु अलीकडे पावसाचे होत असलेले अत्यल्प प्रमाण लक्षात घेता ठिबक सिंचनचा अधिकाधिक वापर करून शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्न मिळवल पाहिजे.
डॉ. हेमांगी जांभेकर म्हणाल्या की, रासायनिक खत व क्षारयुक्त पाणी यामुळे जमिनीचा ऑर्गानिक कार्बन कमी झाल्याने साधारणता तो दोन ते पाच टक्के पर्यंत पाहिजे. यासाठी रासायनिक शेती ऐवजी सेंद्रिय खतांचा वापर अधिक केला पाहिजे.
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले की, तालुक्यातील शेती उद्योगातून शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी सहकार महर्षी दिवंगत शिवाजीराव नागवडे बापू यांनी कारखाना स्थापनेपासून वेळोवेळी शेतकऱ्यांना ऊस परिसंवाद घेऊन मार्गदर्शन केले.
परंतु शेतकरी स्वतः शेतीबाबत निर्णय घेताना दिसत नाहीत. शेतकरी सध्या जुन्या पद्धतीने शेती करतात. रासायनिक खते आणि पिकांवरील विविध प्रकारच्या फवारण्या त्यामुळे त्याचा मानवी आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होत असून,
आयुष्यमान देखील घटले जात आहे. भविष्यकाळात आता सर्वांनाच सतर्क होऊन उत्तम प्रकारे शेती करण्याची आवश्यकता आहे. सूत्रसंचालन भाऊसाहेब बांदल यांनी केले तर कारखान्याचे संचालक राकेश पाचपुते यांनी आभार मानले.