कृषी

शेतकऱ्यांना ‘ही’ शेती करण्यासाठी मिळते सात लाखांचे अनुदान ! प्रक्रियाही सोपी, जाणून घ्या योजनेची सर्व माहिती

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : शासनाकडून विविध स्तरावर अनेक योजना राबवल्या जातात. शेतकऱ्यांसाठी देखील अनेक योजना शासन राबवत असते. शासनाची अशीच एक योजना आहे की जी अनेकांना माहिती नाही किंवा लाभ कसा घ्यावा याविषयी माहिती नाही.

ही योजना म्हणजे अटल बांबू समृद्धी योजना. या योजनेंतर्गत महसूल विभागातील रोजगार हमी योजना विभागातर्फे जिल्ह्यात बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जाते.

विशेष म्हणजे या योजनेंतर्गत असणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा इतर समूहास रोजगार हमी योजनेतून रोप, मजुरीच्या रूपाने लाभार्थीस तीन वर्षापर्यंत ६ लाख ९० हजार अनुदान देण्यात येणार आहे. यावर्षी अहमदनगर जिल्ह्यात जिल्ह्यात ६०० हेक्टरवर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट शासनाने दिले आहे.

सध्या पावसाळा सुरू असल्याने बांबू लागवडीसाठी पोषक वातावरण आहे. परिणामी, लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन उपसंचालक, सामाजिक वनीकरण विभाग यांनी केले आहे. वैयक्तिक किंवा शासकीय जमिनीवर बांबू लागवड करण्यासाठी अनुदान मिळते.

यासाठी रोजगार हमी योजनेतून अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर रोजगार हमी योजनेकडून अंतिम निवड केली जाते. बांबूला खुल्या बाजारात चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.

यंदा वनविभागाने १४ लाख ६७ हजार ५० विविध प्रकारची रोपे लागवडीसाठी तयार केली आहेत. जिल्ह्यातील पंधरा रोपवाटिकांमध्ये रोपे तयार करण्यात आली असून सवलतीच्या दरात रोपे दिली जात आहेत.

समजून घेऊयात की नेमकी ही योजना आहे काय?
अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडून अनुदानावर बांबू लागवड करता येते. वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादित कंपन्या आणि संस्था, समूह अर्ज करू शकतात. याशिवाय शासकीय जमिनीवरही बांबू लागवड करता येते.

या योजनेसाठी अर्ज करताना अर्जासोबत आधारकार्ड, शेतकरी असल्यास सात-बारा, आठ-अ, बँक पासबुकची झेरॉक्स असावी. अहमदनगरचा विचार केलाच तर ६०० हेक्टरवर बांबू लागवडीचे लक्ष आहे.

यामध्ये कृषी कृषी विभाग, वनविभाग, सामाजिक वनीकरण व जिल्हा परिषद या विभागांना ६ लाख ६६ हजार ६०० वृक्षलागवडीचे लक्ष देण्यात आले आहे. एका हेक्टरमध्ये ११११ वृक्षांची लागवड केली जाते.

Ahmednagarlive24 Office