कृषी

Ahmednagar News : आधुनिक शेतीतून अहमदनगरमधील शेतकऱ्याने दाखवला तरुणांना मार्ग, वाटण्याचे घेतले एकरी 3 टन उत्पादन

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : शेती परवडत नाही असा सूर सध्या तरुण लावताना दिसतात. पाण्याचा अभाव, लहरी पाऊस आदी गोष्टींमुळे अनेक लोक शेतीपासून दूर पळतात. परंतु शेतीला आधुनिकतेची जोड दिली, कष्ट, चिकाटी यांचा ताळमेळ घातला तर शेतीतून  उत्पन्न काढता येते.

याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी सखाराम मंचरे हे आहेत. ते पारनेर तालुक्यातील तिखोल येथील आहेत. आधुनिकतेची आणि अनुभवाची जोड देत त्यांनी वाटाण्याचे प्रतिएकर तीन टन उत्पन्न घेतले आहे. अधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे वाटण्याची नियोजनबध्द लागवड, गरजेनुसार औषध फवारणी, योग्य वेळी व योग्य प्रमाणात पाणी देणे तसेच खुरपणी आदींसह मशागत केल्याने त्यांना भरपूर अर्थार्जन झाले आहे.

एकरी 3 टन उत्पादन


वाटाण्याला प्रतिकिलो ४० ते ४५ रुपये भाव मिळत आहे.  एकरी 3 टन उत्पादन त्यांनी घेतले आहे. दरवर्षी २६ जानेवारीच्या दरम्यान इतर धान्य पिकांप्रमाणे वाटाण्याची पेरणी करण्यात येते. पेरणीनंतर नवव्या, दहाव्या दिवशी वाटाणा उगवतो.

बाराव्या दिवशी पहिले पाणी, पंधराव्या, सोळाव्या दिवशी पहिली किटकनाशक व बुरशीनाशक फवारणी करण्यात येते. फवारणीनंतर दुसरे पाणी, तर तिसाव्या दिवशी तिसरे पाणी देण्यात येऊन खुरपणी करण्यात येते.

अशा पद्धतीने पीक आहे तोपर्यंत ते योग्य नियोजन करत राहतात. सखाराम मंचरे यांची तीन एकर शेती आहे. त्यातील दोन एकर क्षेत्रावर ते वाटाण्याचे उत्पादन घेतात. एक एकरामध्ये कांद्याचे उत्पादन ते घेतात.

तरुणांसाठी आदर्श
पारनेरच्या वाटाण्याला पुणे, मुंबईत मोठी मागणी असते. वर्षभर वाटाण्याचे पीक घेतले जाते. मोठी शेंग, चवदारपणा यामुळे पुणे, मुंबई, नाशिक येथे पारनेरच्या वाटाण्याला मोठी मागणी असते.

तंत्रज्ञानाची जोड दिल्याने चांगले पीक आले आणि उत्पादन वाढले, असे मंचरे यांनी सांगितले. हा एक मोठा आदर्श नोकरीसाठी वणवण फिरणाऱ्या तरुणांसाठी व शेतीला कमी लेखणाऱ्या तरुणांसाठी असेल हे नक्की.

Ahmednagarlive24 Office