Ahmednagar News : मागील वर्षी अहमदनगर जिल्ह्यात पाऊस जेमतेमच झाला. बहुतंशी भागात तर अगदी दुष्काळी स्थितीच राहिली. त्याच्या मागील वर्षी अतिवृष्टी, गारपीट, ढगाळ हवामानाने पिकांचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान यंदा पावसाचे प्रमाण सरासरी इतके राहील, पाऊस चांगला राहील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
त्यामुळे बळीराजा आता शेतीच्या मशागतीच्या कामात गुंतला आहे. येत्या खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून ठेवली आहे. चालू वर्षी तरी वरुणराजा कृपा करेल या आशेवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली आहे. मागील वर्षी मुगाच्या पेरणीवर मोठा परिणाम जाणवला होता.
चालू वर्षी मान्सून ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाच्या खरीप पिकांबाबत आशा वाढलेल्या आहेत. तालुक्यात मुख्यत: बाजरी, मूग, सोयाबीन पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात होत असते.
चारा पिकेही कमी-अधिक प्रमाणात घेतली जातात. मृग नक्षत्रात पावसाने पेरणी योग्य हजेरी लावली तर, खरीप पिकांसाठी फायदेशीर ठरत असते. दुपारी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने सकाळ व सायंकाळी मशागतीची कामे शेतकरी करीत आहेत.
कृषी विभागाचीही लगबग सुरु
कृषी विभागाच्या वतीने देखील खरीप हंगामासाठी तयारी सुरू केली असून गावोगावी विविध उपक्रम सुरू केलेले आहेत त्यामध्ये घरगुती पद्धतीने बियाणे उगवण क्षमता चाचणी, बीज प्रक्रिया, शेततळे, गोगलगाय नियंत्रण, पाणीटंचाई पार्श्वभूमीवर फळबागा जतन करणे, प्रात्यक्षिक, कीड नियंत्रण प्रात्यक्षिक, शेतीशाळा नियोजन,
पीक तंत्रज्ञान प्रसारासाठी प्रशिक्षण, केंद्रनिहाय कर्मचारी नियुक्ती, आपत्कालीन पीक नियोजन, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, फळबाग लागवड योजना, खते बियाणे औषधे यांचे परवाने निर्गमित करणे, फळबागा लागवडीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर, मृद नमुने, खतांचा वापर यासह अशाप्रकारे २८ उपक्रमांवर कृषी विभागाचे काम सुरू आहे.
पेरणीची घाई नको
शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये. १०० मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. सुदृढ, उच्च प्रतीचे बियाणे वापरण्यात यावे. तसेच बीज प्रक्रिया केल्याशिवाय बियाणे वापरू नयेत. काही अडचण असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी अधिकारी करत आहेत.