कृषी

Farmer Success Story: यावर्षी कपाशीने नाही तर तुरीने तारले! साडेपाच एकरमध्ये खर्च वजा जाता मिळवला 4 लाख 60 हजार रुपयांचा नफा

Published by
Ajay Patil

Farmer Success Story:- परिस्थिती पाहून कुठल्याही गोष्टीत बदल करणे किंवा परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करणे या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. हा नियम व्यावसायिक क्षेत्रासोबतच कृषी क्षेत्रामध्ये देखील तितकाच  लागू होतो.

शेतीमध्ये देखील त्याच त्याच पिकांची लागवड करण्यापेक्षा काहीतरी वेगळ्या पिकांची लागवड करून जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करणे खूप गरजेचे आहे. अगदी याच मुद्द्याला धरून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील जैतापूर या कन्नड तालुक्यात असलेले छोट्याशा गावातील शेतकरी अक्षय झाल्टे याने कपाशी पिकाला रामराम ठोकत तूर लागवड केली

व या तूर लागवडीतून लाखो रुपयांचा नफा मिळवण्याची किमया साध्य केली आहे. नेमके अक्षय यांनी तूर लागवडीचे नियोजन कसे केले? याबाबतची माहिती आपण या लेखात घेऊ.

 तूर लागवडीतून मिळवले लाखोत उत्पन्न

 याबाबत सविस्तर वृत्त असे की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेल्या जैतापूर या गावचे शेतकरी अक्षय झाल्टे यांच्याकडे 35 ते 40 एकर वडिलोपार्जित जमीन आहे. या जमिनीमध्ये ते प्रामुख्याने कांदा तसेच ऊस व कपाशी तसेच मक्यासारखी पिके घेतात.

या पिकांसोबत ते तूर पिकाची लागवड देखील करायचे परंतु तुरीचे क्षेत्र इतर पिकांच्या तुलनेत कमी असायचे. अक्षय यांनी बीएससी ऍग्री चे शिक्षण पूर्ण केलेले असून त्यानंतर मात्र त्यांनी कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजी नगर व कृषी विज्ञान केंद्र बदनापूर येथील बियाणे वाटप केंद्र छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अनेक वेळा भेटी दिल्या

व या माध्यमातून त्यांना बदनापूर कृषी विज्ञान केंद्राने संशोधित केलेले बीडीएन 711 या तुरीच्या वाणाविषयी माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी कपाशी पिकावर येणारा खर्च तसेच कपाशी वेचणीसाठी येणाऱ्या अनेक समस्या यांचा विचार करता कपाशी पिकाचे क्षेत्र कमी केले

व 2019 मध्ये प्रयोग म्हणून सात एकर तुरीची लागवड केली व यामध्ये कमीत कमी खर्चामध्ये त्यांना चांगले उत्पन्न मिळाले. त्यामुळे सलग 2020 ते 22 या कालावधीत त्यांनी तूर पिकाच्या विषयी संपूर्ण अनुभव घेतला व आज तुर उत्पादनाच्या बाबतीत त्यांनी हातखंडा मिळवला असून चांगले उत्पन्न मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.

 यावर्षी मिळवले लाखोत उत्पन्न

 यावर्षी अक्षय यांनी जवळपास साडेपाच एकर क्षेत्रावर सहा बाय दोन फुट अंतरावर तुरीची लागवड केलेली होती. लागवडीनंतर 45 दिवसांनी त्यांनी तुरीच्या शेंड्यांची छाटणी करून कीटकनाशक तसेच बुरशीनाशक व सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी घेतली.

या साडेपाच एकर क्षेत्रावरील तूर लागवडीकरिता त्यांना शेत तयार करण्यापासून ते निविष्ठा खरेदी, लागवड तसेच काढणी असा साडेपाच एकरामध्ये सरासरी एक लाख रुपये इतका खर्च आला व तुरीचे जवळपास 64 क्विंटल उत्पादन त्यांना मिळाले.

या तुरीची विक्री हंगामाच्या सुरुवातीला केल्यामुळे त्यांना 8900 रुपये प्रतिक्विंटल एवढा बाजार भाव मिळाला. यामुळे त्यांचा संपूर्ण खर्च वजा जाता त्यांना चार लाख 60 हजार रुपयांचा नफा या माध्यमातून मिळाला.

 या पद्धतीने अक्षय झाल्टे यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते की परिस्थिती आणि योग्य वेळ आणि बाजारपेठेचा अभ्यास करून जर पिकांची लागवड केली तर नक्कीच शेतीतून देखील चांगले उत्पन्न मिळवता येते.

Ajay Patil