Papaya Crop Cultivation:- तुमच्याकडे जर कल्पनाशक्ती असेल आणि तंत्रज्ञानाचा वापर योग्य ठिकाणी करण्याची लकब असेल तर तुम्ही कुठलीही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतात. शेती क्षेत्रामध्ये देखील जर तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर केला आणि योग्य व्यवस्थापन ठेवले तर अगदी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील लाखो रुपये कमवू शकतात व हे आपल्याला अनेक शेतकऱ्यांच्या उदाहरणावरून सध्या दिसून येते.
शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला गेल्यामुळे अगोदर जे उत्पन्न पाच ते दहा एकरमध्ये शेतकरी घेत होते तेवढे उत्पन्न आता दोन ते तीन एकर क्षेत्रामध्ये देखील शेतकरी घेऊ लागले आहे. वेगवेगळ्या पिकांची लागवड व त्या लागवडीसाठी वापरण्यात आलेल्या अत्याधुनिक पिक लागवडीच्या पद्धती या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरताना दिसून येत आहेत.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील देवेंद्र गायकी या शेतकऱ्याचे उदाहरण घेतले तर ते इतर शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणा देणारे आहे.
या शेतकऱ्याने पपई फळ पिकामध्ये झेंडू आणि कांदा या दोन आंतर पिकांचा समावेश करून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवण्याची किमया साध्य केली आहे. पपई पिकासाठी झालेला खर्च झेंडू आणि कांदा या आंतरपिकाच्या माध्यमातून वसूल करून पपईच्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न निव्वळ नफा म्हणून त्यांना प्राप्त झाले आहे.
पपईमध्ये आंतर पिकांची लागवड करून देवेंद्र गायके यांनी मिळवले लाखो रुपये
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील रहिवासी असलेले आणि शेतीमध्ये कायम वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध असलेले देवेंद्र गायकी यांनी पपई लागवड करण्याचे ठरवले व त्याकरिता अर्धा एकर क्षेत्राची निवड केली.
एप्रिल 2024 मध्ये त्यांनी अर्धा एकरवर जवळपास 400 पपईच्या रोपांची लागवड केली. परंतु कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचे त्यांनी ठरवलेले होते व कमी जागेचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी पपईच्या बागेमध्येच 800 झेंडूची रोपे व कांद्याचे आंतरपीक घेतले.
या अंतर पिकांमुळे त्यांना खूप मोठा फायदा झाला. पहिला फायदा म्हणजे या पद्धतीमुळे जमिनीचा पूर्ण व उत्तम वापर करणे शक्य झाले व आंतर पिकाच्या माध्यमातून देखील त्यांना पैसे मिळाले. यामध्ये कांद्याच्या उत्पादनातून त्यांना 80 हजार रुपये तर झेंडू फुलांच्या विक्रीतून 50 हजार रुपयांच्या आर्थिक उत्पन्न मिळाले.
महत्त्वाचे म्हणजे पपई बागेसाठी त्यांनी जो काही संपूर्ण खर्च केलेला होता तो या कांदा व झेंडू फुल पिकाच्या माध्यमातून भरून निघाला. तसेच पपई लागवडीमधून देखील त्यांना भरघोस असा नफा मिळाला. पपईचे उत्पादन व त्यातून मिळालेला नफा जर बघितला तर त्यांनी आतापर्यंत दहा क्विंटल पपईची काढणी केली व 1700 रुपये प्रतिक्विंटल या दराने पपईची विक्री केली.
म्हणजे त्यांना दहा क्विंटल पपईपासून एक लाख 70 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. परंतु त्यांनी या पपई पिकासाठी जो काही खर्च झालेला होता तो कांदा आणि झेंडू या आंतर पिकांच्या माध्यमातून वसूल झाल्यामुळे पपईपासून मिळालेले एक लाख 70 हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना निव्वळ नफा म्हणून राहिले. म्हणजेच अशा पद्धतीने त्यांनी अर्धा एकर क्षेत्रामध्येच लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवण्याची किमया साध्य केली.
जमिनीचे जर योग्य नियोजन आणि कार्यक्षम वापर करण्याच्या दृष्टिकोनातून जर प्रयत्न केले तर अल्पभूधारक शेतकरी देखील कमीत कमी जमिनीत लाखो रुपयांची कमाई करू शकतो हे देवेंद्र गायके यांच्या या प्रयोगाने सिद्ध करून दाखवले आहे.तसेच आंतरपीक लागवडीमुळे केलेली गुंतवणूक वाया जाईल याच्याबद्दलची जोखीम देखील कमी व्हायला मदत होते आणि मुख्य पिकापासून मिळणारा पैसा हा निव्वळ नफा म्हणून राहतो.