कृषी

समीर भाऊने अंजीर शेतीतून वर्षाला केली दीड कोटींची उलाढाल! महिना ४०००० रुपये पगाराची सोडली नोकरी

Published by
Ajay Patil

Fig Farming:- सध्या जर आपण उच्चशिक्षित तरुणांची व्यथा पाहिली तर ती अतिशय बिकट असून अगदी छोट्या-मोठ्या नोकऱ्यांसाठी वणवण भटकण्याची वेळ तरुणांवर आल्याचे सध्या चित्र आहे. आजकाल बेरोजगारीचे चित्र खूप गंभीर अशा परिस्थितीमध्ये असून देशापुढे ही सगळ्यात मोठी भयानक अशी समस्या आहे.

त्यामुळे आता अनेक उच्चशिक्षित तरुण व्यवसायाकडे वळत आहेत. परंतु एकीकडे नोकरी नसताना नोकरीच्या शोधात फिरणारे तरुण आणि दुसरीकडे हातात 40 ते 50 हजार रुपये प्रतिमहिना पगाराची नोकरी सोडून शेती सारख्या व्यवसायात येणारे तरुण देखील आपल्याला दिसून येतात.

हातातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती सारख्या व्यवसायामध्ये येण्याचा निर्णय हा पाहिजे तितका सोपा नाही. परंतु बरेच तरुण आता असा जोखमीचा निर्णय घेताना आपल्याला दिसून येतात. अगदी याच पद्धतीचा निर्णय दौंड येथील समीर डोंबे या मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या तरुणाने घेतला.

समीर डोंबे यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची नोकरी सोडून यशस्वी केली अंजीर शेती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दौंड येथील समीर डोंबे हे उच्चशिक्षित असून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण पूर्ण केलेले आहे व त्यांना प्रति महिना चाळीस हजार रुपये पगाराची नोकरी देखील होती.

परंतु नोकरी करत असताना मात्र त्यांचे मन काही नोकरीमध्ये रमत नव्हते व त्यांनी त्याकरिता नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला व शेती व्यवसाय करावा असे ठरवले. एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी असताना शेती सारख्या व्यवसायात येणे हे नक्कीच त्यांच्या कुटुंबाला पटणारे नव्हते.

कुटुंबाचा विरोध असताना देखील समीर हे त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले व त्यांनी अंजीर शेतीची जी काही कुटुंबाची जुनी परंपरा होती तीच पुढे नेण्याचा निर्णय घेतला. परंतु यामध्ये त्यांना त्यांच्या कुटुंबाने कुठलाही प्रकारचा पाठिंबा मात्र दिला नाही. शेतीमध्ये समीर अयशस्वी होईल असेच प्रत्येकाला वाटत होते.

परंतु याच अंजीर शेती मधून समीर यांनी चांगली प्रगती केली असून अंजीर विक्रीतून वर्षाला दीड कोटी रुपयांचा व्यवसाय ते सध्या करत आहेत. अगोदर अडीच एकर क्षेत्रामध्ये त्यांनी अंजिराची लागवड केली होती व आता ते क्षेत्रांमध्ये वाढ करत पाच एकर क्षेत्रामध्ये त्यांनी अंजिराची लागवड केली आहे.

विशेष म्हणजे त्यांनी अंजिरावर प्रक्रिया करणारा युनिट देखील उभा केला असून यामध्ये त्यांनी स्वतःचा पवित्रक नावाचा ब्रँड विकसित केला व त्या ब्रँडच्या अंतर्गत अंजीर जॅम तयार करून तो ऑनलाइन पद्धतीने विक्री करायला सुरुवात केली. जेव्हा कोरोना कालावधी होता तेव्हा त्यांनी लॉकडाउनच्या कालावधीमध्ये अनेक ग्राहक जोडले. व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्या माध्यमातून ऑर्डर घ्यायला सुरुवात केली.

लॉकडाऊन सारख्या कालावधीमध्ये मोठमोठ्या सुपर मार्केटमध्ये देखील फळांची वाणवा होती. परंतु त्या कालावधीत देखील समीर यांची विक्री मात्र जोरात सुरू होती. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये देखील त्यांनी नुसत्या ऑनलाईन ऑर्डरच्या माध्यमातून 13 लाख रुपयांची कमाई केली होती.

अशा पद्धतीने समीर डोंबे यांनी पारंपारिक अंजीर शेती पासून सुरुवात केली व काहीतरी वेगळे करण्याच्या उद्देशाने ते अंजीर सुपर मार्केट आणि ऑनलाईन माध्यमातून विक्री करून मोठ्या प्रमाणावर पैसा मिळवला आहे.

Ajay Patil