नाफेड मार्फत २४०० रुपये प्रमाणे कांदा खरेदीचा प्रयत्न, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांची महत्वाची माहिती…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सध्या कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे. कांद्यावर निर्यात बंदी केल्याने भाव अगदीच गडगडले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी यावर नाराजगीही व्यक्त केली. दरम्यान आता शेतकऱ्यासांठी एक दिलासादायक बातमी आहे. भविष्यात नाफेड मार्फत २ हजार ४०० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांचा कांदा विकत घेण्याचा विचार असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

नगरमध्ये आयोजित महायुतीच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. नगरमध्ये आयोजित महायुतीच्या पहिल्याच मेळाव्यात मंत्री विखे पाटील बोलत होते. लोकप्रतिनिधींसह महायुतीमधील सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

काय म्हणाले मंत्री विखे

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कांदा पिकाला राज्यातील महायुती सरकारने ३५० रुपयांप्रमाणे अनुदान दिले. आघाडी सरकारच्या काळात असणाऱ्या पीक विमा आणि आता आमच्या सरकारच्या काळातील पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तपासा. केंद्रात १५ वर्षे आणि राज्यात सत्ता असणाऱ्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या कांदा पिकाबाबत काय धोरण घेतले?

असा सवाल उपस्थित करत भविष्यात नाफेड मार्फत २ हजार ४०० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांचा कांदा विकत घेण्याचा विचार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच त्यांनी यावेळी इंडिया आघाडीवरही जोरदार टीका केली. या महायुतीच्या मेळाव्यात भाजपसह सर्व घटक पक्ष सामील झाले होते. आगामी ध्येय धोरणाविषयी यावेळी चर्चा झाली.

मोठं राजकीय वक्तव्य

यावेळी विखे पाटील यांनी मोठं राजकीय वक्तव्य केले. भविष्यात अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाबाबत त्यांनी वक्तव्य केले. विखे पाटील म्हणाले, देशात आणि जगात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व विश्वमान्य झाले आहे. अशा उत्तुंग नेतृत्वाखाली काम करणे कधीही चांगले. त्यामुळे अन्य पक्षांमध्ये आऊटगोईंग वाढणार असून ते भाजपमध्ये येणार आहे. भाजपच्या भूमिकेशी काही लोक सुसंगत आहे. ते त्यांचे मन तयार करत आहेत आणि ते संपर्कात देखील असून लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.