Animal Care : भारतात पशुपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. पशुपालन हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायद्याचा आहे. मात्र असे असले तरी पशुपालन व्यवसायात यशस्वी होण्यासाठी पशुंचे आरोग्य अबाधित राखणे आवश्यक ठरते. गाई म्हशींना वेगवेगळे आजार होत असतात.
या आजारामुळे पशुपालक शेतकरी बांधवांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. कासदाह हा देखील असाच एक आजार असून हा दुभत्या जनावरांना होतो. दुभत्या जनावरांच्या कासेला सूज, जडपणा आणि वेदना ही कासेच्या आजाराची किंवा कासदाह आजाराची लक्षणे आहेत.
कासदाह रोगाचे विविध प्रकार आहेत. उदाहरणार्थ, अतिशय जलद, जलद आणि मंद दीर्घकालीन रोगामध्ये कासेला सूज, गरम, कडक आणि वेदनादायक बनते. कासेतून फाटलेले, गोठलेले किंवा दही सारखे दूध बाहेर येते.
काही वेळा दुधासोबत रक्तही बाहेर पडतं. दूध गढूळ आणि पिवळे-तपकिरी होते. दुधाला दुर्गंधी येऊ लागते. कासेमध्ये गुठळ्या असतात आणि कास आकाराने लहान बनू शकत. दुधाचे प्रमाण कमी होते. या रोगात जनावरांना ताप येतो व त्यामुळे खाणेपिणे कमी होते.
रोगाची कारणे
कासदाह रोग विषाणू, जिवाणू, मायकोप्लाझ्मा किंवा बुरशीमुळे होतो. हा रोग संक्रमित जनावराच्या संपर्कात येणे, दूध काढणाऱ्याचे हात घाणेरडे, जनावरांचा घाणेरडा गोठा, अपुरे व अनियमित दूध काढणे, खडबडीत फरशी व कासेला दुखापत व संसर्ग यामुळे देखील होतो.
थानेला रोग ओळखणे
स्ट्रिप कप टेस्ट आणि कॅलिफोर्निया स्तनदाह चाचणीच्या माध्यमातून हा रोग ओळखला जाऊ शकतो.
प्रतिबंधात्मक उपाय योजना
जनावरांच्या घरात माशा नसाव्यात. जनावरांचे निवासस्थान, गोठा नीटनेटका व स्वच्छ ठेवावा. गोठा फिनाईलने स्वच्छ करावा. दूध काढण्यापूर्वी हात स्वच्छ करा आणि स्वच्छ भांड्यातच दूध काढा. दूध काढण्यापूर्वी आणि नंतर एक टक्का लाल औषधाच्या द्रावणाने कासेची स्वच्छता करणे देखील चांगले असते.
दुभत्या जनावरांच्या कासेमध्ये प्रतिजैविक उपचार केल्याने दूध सुकते तेव्हा पुढील स्तनपानापर्यंत कासदाहची शक्यता कमी होते. दूध योग्य पद्धतीने काढावे. कासेत जखम असल्यास त्वरित उपचार करा. कासदाह रोगाची लक्षणे दिसताच पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून तात्काळ उपचार करून घ्यावेत, अन्यथा कासेचे नुकसान होऊन पशुपालकाचे आर्थिक नुकसान होऊ शकते.