Animal Care In Summer :- सध्या वातावरणामध्ये कमाल तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याची स्थिती असून वातावरणामध्ये प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवत आहे. त्यामुळे निश्चितच या वाढलेल्या तापमानाचा विपरीत परिणाम हा पशुधनावर देखील होताना दिसून येतो. उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये जनावरे जास्त पाणी पितात व आहार कमी खातात. त्यामुळे जनावरांची जी काही चयापचयाची क्रिया असते ती मंदावते व जनावरे शांत होतात.
या सगळ्या शारीरिक प्रक्रियेचा परिणाम हा दूध उत्पादनावर दिसून येतो व एवढेच नाही तर गाईंच्या प्रजनन क्षमतेवर देखील याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच तापमानात जास्त वाढ झाली व जनावरांची योग्य काळजी घेतली नाही तर उष्माघातासारखा त्रास होऊ शकतो.
त्यामुळे उन्हाळ्याच्या कालावधीत जनावरांच्या संगोपनामध्ये काही बदल करणे गरजेचे असते. या बदलांमध्ये पशुपालकांनी जनावरांचा आहार आणि पाणी या दोन गोष्टींमध्ये महत्त्वाचे बदल करणे आवश्यक असून यामध्ये केलेले बदल दूध उत्पादनामधील सातत्य ठेवण्यात आणि जनावरांच्या आरोग्य व्यवस्थित ठेवण्यामध्ये मदत करतात.
उन्हाळ्यात जनावरांची अशा पद्धतीने घ्या काळजी
1- खाद्याचे व्यवस्थापन– उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने जनावरांना हिरवा चारा, पशुखाद्य, मक्याची कूट आणि धान्य असे तयार केलेले खाद्य खायला द्यावे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उष्णता कमी व्हावी याकरिता खाद्याच्या प्रमाणात वाढ करावी. जवळपास ही वाढ करताना तीस ते पस्तीस टक्क्यांवरून 50 ते 60 टक्क्यांपर्यंत खाद्याचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे.
परंतु या प्रमाणापेक्षा जास्त खाद्याचे प्रमाण वाढवू नये. यापेक्षा जास्त खाद्य दिले तर जनावरांना पचनाचा त्रास होऊ शकतो. आहारामध्ये हिरवा चारा भरपूर द्यावा व त्या हिरव्या चाऱ्यामध्ये बरसिम,लुसर्न, ज्वारी किंवा मका इत्यादी हिरव्या चाऱ्याची वैरण द्यावी. या प्रकारच्या वैरणी मधून जनावरांना दहा ते पंधरा टक्के तंतुमय पदार्थ उपलब्ध होतात.
महत्वाचे म्हणजे या कालावधीत कोरड्या किंवा सुक्या वैरणीचे प्रमाण कमी करावे. असं केल्यामुळे जनावरांच्या शरीरातील उष्णतेचे संतुलन राखले जाते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उन्हाळ्यामध्ये जनावरांच्या शरीरामधून बी 1, बी 2, बी 6 इत्यादी जीवनसत्वे व त्यासोबतच मॅग्नेशियम व कॅल्शियम सारख्या महत्त्वाच्या खनिजांचे प्रमाण कमी व्हायला लागते.
त्यामुळे त्यांचा योग्य प्रमाणात खाद्याच्या माध्यमातून वापर करणे गरजेचे आहे. तसेच खुराकांमध्ये मका आणि इतर धान्याचे भरडाचे प्रमाण कमी ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे शरीरात जास्तीची उष्णता तयार होत नाही. जनावरांचे उन्हाळ्यामध्ये एक वैशिष्ट्य असते व ते म्हणजे रात्रीच्या वेळी थंडावा असतो तेव्हा जनावरे जास्त चारा खातात. त्यामुळे रात्री त्यांना भरपूर चारा खायला द्यावा.
2- पाण्याचे व्यवस्थापन– उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या व्यवस्थापनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. उन्हाळ्यामध्ये जर तुमच्या गोठ्यात संकरित जनावरे असतील तर त्यांच्या शरीरावर दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये दोन ते तीन वेळा थंड पाणी शिंपडावे. पाण्याची उपलब्धता जर जास्त असेल तर त्यांची आंघोळ घातली तर उत्तमच ठरते. तसेच प्रतिजनावर प्रत्येक दिवसाला 30 ते 40 लिटर पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असते उन्हाळ्यामध्ये पाण्याची गरज वाढते. साधारणपणे इतर ऋतूंच्या तुलनेत पाहिले तर उन्हाळ्यामध्ये वीस ते पंचवीस टक्के जनावरांना अधिक पाणी प्यायला लागते.
त्यामुळे उन्हाळ्याच्या कालावधीत जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ आणि थंड व मुबलक पाणी 24 तास उपलब्ध करून द्यावे. तसेच जनावरांच्या संख्येनुसार पिण्याच्या पाण्याच्या भांड्यांची व्यवस्था करावी. तसेच या कालावधीमध्ये पिण्याच्या पानांच्या हौदवर जनावरांची पाणी पिताना जास्त गर्दी होईल किंवा पाणी पिताना त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. आता बाजारामध्ये एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतील अशा प्रकारचे हौद उपलब्ध आहेत.
त्यामुळे असे हौद या कालावधीत वापरले तर फायद्याचे ठरते. तसेच गोठ्यामधील तापमानाकडे लक्ष ठेवावे. गोठ्यामध्ये स्वच्छ आणि मोकळी हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी व तापमानाचे व्यवस्थापन करण्यासाठी गोठ्यात पंखे तसेच कुलर व फॉगर्स इत्यादी व्यवस्था करावी. जर गोठ्यामध्ये जनावरांना फॉगर्सच्या मदतीने सात ते आठ तास थंड केले तर जनावरांच्या शरीराचे तापमान कमी व्हायला मदत होते व जनावरांचे खाद्य खाण्याचे प्रमाण वाढते व दूध उत्पादन देखील वाढते.