कृषी

Animal Husbandry: उन्हाच्या लाहीलाही पासून जनावरांचे करा संरक्षण! करा ‘या’ उपाययोजना आणि टाळा जनावरांमधील उष्माघात

Published by
Ajay Patil

Animal Husbandry:- सध्या मार्च महिना सुरू असून जवळपास मार्च महिन्याचा हा शेवटचा आठवडा सुरू आहे. त्यामुळे साहजिकच उन्हाळ्याची सुरुवात झालेली असून मार्च ते मे महिन्याच्या कालावधीमध्ये उन्हाची तीव्रता वाढते व सगळीकडे अंगाची लाही लाही करणारा उकाडा मोठ्या प्रमाणावर त्रासदाय ठरतो.

ज्याप्रमाणे मनुष्याला या उन्हाचा त्रास होतो.अगदी त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यांना जसे की, गाई तसेच म्हशी व बैलांना देखील या उन्हाळ्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत असतो. या कालावधीमध्ये जनावरांना उष्माघात होण्याची दाट शक्यता असते.

या उष्माघातामुळे कधी कधी जनावरांचा जीव देखील जाऊ शकतो. त्यामुळे मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत म्हणजेच एकंदरीत उन्हाळ्यामध्ये जनावरांची व्यवस्थित काळजी घेणे खूप गरजेचे असते.

त्यामुळे या लेखात आपण या कालावधीत जनावरांना उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून काय उपाययोजना कराव्यात? याबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत.

 या उपायोजना जनावरांचे करतील उष्माघातापासून रक्षण

1- उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये जर जनावरांना बाहेर चरायला सोडायचे असेल तर ते सकाळी लवकर किंवा संध्याकाळी चार नंतर सोडावे.

2- ज्या हौदमध्ये जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केलेली असते तो हौद चून्याने रंगवून घ्यावा व त्यामध्ये तुरटी फिरवून पाणी स्वच्छ करून घेणे गरजेचे असते.

3- जनावरांच्या दररोजच्या पाण्यामध्ये मीठ व थोडा गूळ टाकल्यास जनावरे जास्त प्रमाणामध्ये पाणी पितात.

4- तसेच जनावरांच्या गोठ्यांची उंची जास्त असावी. उंची जास्त असल्यास नैसर्गिक हवा मोकळेपणाने गोठ्यामध्ये मिळत राहते व गोठा थंड राहतो. छपराचा गोठा असेल तर त्यावर पालापाचोळा किंवा ताडपत्री टाकून तापमान वाढणार नाही याची काळजी घ्यावी.

5- गोठ्यामध्ये जर संकरित गायी असतील तर मात्र फॉगर्स लावणे गरजेचे असते. फॉगर्समुळे जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित राहते व गोठ्यातील तापमानाचे देखील संतुलन राखले जाते. तसेच गोठ्याच्या सभोवती झाडे असली तर गोठा  थंड व आरामदायी राहतो.

6- तसेच उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये जनावरांच्या चारांमध्ये हिरव्या चाऱ्याचा समावेश जास्त प्रमाणात करावा. कारण असे केल्याने त्यांची पचनक्रिया व्यवस्थित राहायला मदत होते व पोटाचे आजार देखील होत नाहीत.

7- तसेच दुभती जनावरे असतील तर त्यांच्याकरिता हिरवा चारा तसेच मुरघासचा वापर, खनिज मिश्रण व वेळोवेळी जंतनाशक औषधांचा वापर केल्यास  जनावर आजारी पडत नाहीत.

8- शेतीमध्ये काम करणारे बैल असतील तर त्यांच्याकडून सकाळी किंवा संध्याकाळीच काम करावे. दुपारी उन्हात काम करून घेऊ नये.

 उष्माघाताची साधारणपणे लक्षणे

जनावरांना उष्माघात झाल्यास साधारणपणे त्याची लक्षणे पुढील प्रमाणे दिसून येतात व यामध्ये जनावरांची भूक मंदावते व नाकपुडी कोरडी होते. डोळे लाल होणे, शरीराच्या तापमानामध्ये वाढ होणे तसेच नाका मधून रक्त येणे,  श्वासाचा वेग वाढणे म्हणजे श्वास जोरात घेणे, धापा टाकने तसेच जनावरांना चक्कर आल्यासारखे वाटते इत्यादी लक्षणे दिसून येतात.

 हे प्रतिबंधात्मक उपाय करतील जनावरांचे उष्माघातापासून रक्षण

1- शक्यतो जनावरांना सकाळी 11 ते दुपारी तीन या कालावधीमध्ये बाहेर चरण्याकरता सोडू नये

2- जनावरांना चारा देताना जास्त प्रमाणामध्ये हिरव्या चाऱ्याचा वापर करावा व वाळलेल्या चाऱ्याचा वापर जास्त करू नये.

3- तसेच गोठ्यामध्ये जास्त जनावर एका वेळी बांधू नये. असे केले तर गर्दी होऊन जनावरांना श्वास घ्यायला देखील समस्या निर्माण होतो.

4- उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये जनावरांना शुद्ध व थंड पाणी प्यायला मिळेल या पद्धतीने प्रयत्न करावेत.

5- उष्माघात झालास तर जनावरांवर तात्काळ पशु तज्ञांकडून उपचार करून घेणे गरजेचे असते.

Ajay Patil