Ahmednagar News : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परीसरात व पाणलोटात अवकाळी पावसाने दणका देत भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अचानक आलेल्या या पावसाने आदिवासी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
अकोले तालुक्यातील भंडा- करदरा धरणाच्या पाणलोटात तसेच परिसरात गुरुवारी चार वाजेच्या सुमारास अचानक अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या भातपिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
भंडारदरा धरणाच्या पाणलोटात यावर्षी उशिरा पाऊस दाखल झाला होता. त्यामुळे अगोदरच भातशेतीच्या लागवडीचा प्रश्न उभा राहिला होता. त्यानंतरही पावसाच्या प्रमाणात सातत्य नसल्याने अनेक आदिवासी शेतकऱ्यांनी भातपिके म्हणावी तशी उभी राहीली नव्हती.
यातून सावरुन काही शेतकऱ्यांची पिके डोलाने उभी राहीली; परंतु भातपिकांच्या शेवटीशेवटी केवळ एका पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकासान झाले. तशातच कशीबशी आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी पोटाला चिमटा देत पाणी भरुन भातपिके मोठी केली.
दिवाळीच्या अगोदर काही दिवस भात सोंगणी आदिवासी भागेत जोरदार सुरु आहे; मात्र गुरुवारी अचानक चार वाजेच्या दरम्यान चिचोंडी, शेंडी, भंडारदरा, मुतखेल, कोलटेंभे, रतनवाडी, साम्रद, घाटघर, लव्हाळवाडी, उडदावणे, पांजरे परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या.
या अचानक सुरु झालेल्या पावसामुळे शेतामध्ये सोंगुन पडलेल्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भात गोळा करुन व्यवस्थित झाकुन ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात ताराबंळ उडाली,
तर काही भातपिके मात्र पावसाने भिजुन गेली. हे भातपिक काळे पडण्याची शक्यता शेतकऱ्यांकडुन वर्तविण्यात येत आहे. नुकसान झालेल्या भातपिकांचे महसूल व कृषी विभागाकडुन पंचनामे करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.