बदलती हवामान परिस्थिती आणि वारंवार येणारे नैसर्गिक संकटे त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसत आहे. परंतु तरीदेखील शेतकरी या परिस्थितीशी दोन हात करत व्यवस्थापनाच्या पद्धतीत आणि पीक लागवडीमध्ये बदल करत शेती कशी फायद्याची होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करताना दिसून येत आहेत.
तसेच तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे अगदी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळवणे आता शक्य झालेले आहे. याच मुद्द्याला धरून जर आपण अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात असलेल्या नांदूर या गावच्या अमोल आणि बाबासाहेब भदे या बंधूंचा विचार केला
तर हे तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय शास्त्रशुद्ध रीतीने आले पिकाची लागवड करतात व त्यापासून भरघोस उत्पादन देखील मिळवतात. यावर्षी त्यांनी एका एकर मध्ये 30 टन आल्याचे विक्रमी उत्पादन मिळवले आहे.
भदे बंधू अशा पद्धतीने करतात आले पिकाचे व्यवस्थापन
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात असलेल्या नांदूर येथील बाबासाहेब भदे व अमोल भदे दोन्ही शेतकरी बंधूंनी आले लागवडीमध्ये हातखंडा मिळवला असून आतापर्यंत त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने आले पिकाची लागवड केली आहे.
जर आपण त्यांचे लागवडीचे नियोजन पाहिले तर ते आल्याची लागवड करणे अगोदर शेतीची दोन वेळा नांगरणी व त्यानंतर एक वेळा कल्टीवेटर करून त्यावर रोटावेटर मारून जमिनीत चांगली भुसभुशीत करून घेतात. जेव्हा अशा पद्धतीने जमिनीची मशागत केली जाते तेव्हा त्यावेळेस एका एकरमध्ये ते चार ट्रॅक्टर ट्रॉली चांगली कुजलेले शेणखत वापरतात.
त्यानंतर साडेचार फूट अंतरावर बेड पद्धतीने ठिबक सिंचनाचा वापर करून त्यावर बीज प्रक्रिया करून आल्याची लागवड केली जाते. तसेच ते माती परीक्षण करून त्यानुसार सेंद्रिय व रासायनिक खतांचे योग्य नियोजन करतात.
यावर्षी एकरी मिळवले विक्रमी 30 टन आल्याचे उत्पादन
यावर्षी त्यांनी एका एकर क्षेत्रामधून आल्याचे विक्रमी 30 टन उत्पादन मिळवले आहे. याबद्दल माहिती देताना ते म्हणतात की शेणखताचा वापर व्यवस्थित केल्यामुळे उत्पादनात ही वाढ झाली आहे. तसेच ठिबक पद्धतीमुळे कमी पाण्यात व्यवस्थित पाण्याचे व्यवस्थापन करून अधिक उत्पादन मिळवता आल्याचे देखील ते सांगतात.
तसेच पिकासाठी ते कीटकनाशकांचा वापर करत असताना त्यासोबत सेंद्रिय, वनस्पतीजन्य आणि एकात्मिक कीड नियंत्रणावर मोठ्या प्रमाणावर भर देतात. पिकांची गरज ओळखून खत व्यवस्थापन करतात.खत व्यवस्थापनामध्ये जिवाणू खते,
विद्राव्य खते व त्यासोबत सेंद्रिय खते आणि गरजेनुसार रासायनिक खतांचा वापर करण्यावर त्यांचा भर असतो. आले पिकाचा कालावधी जरी सात ते आठ महिन्याचा असला तरी चांगले व्यवस्थापन केल्यामुळे या पिकापासून उत्पादन देखील चांगले मिळते व नफा देखील चांगला राहतो असे देखील त्यांनी सांगितले.