Banana Farming:- तंत्रज्ञानाच्या वापराने आता शेतकरी मोठ्या प्रमाणावर पिकांचे उत्पादन घेऊ लागले आहेत व दर्जेदार उत्पादनामुळे आता शेतकरी अनेक प्रकारचा शेतीमाल निर्यात देखील करू लागले आहेत. तंत्रज्ञानाचा अचूक वापर आणि वेळेला केलेले व्यवस्थापन कुठल्याही पिकाच्या दर्जेदार उत्पादनासाठी खूप महत्त्वाचे असते.
महाराष्ट्रातील शेतकरी आता आधुनिक पद्धतीने शेती करत असून यामध्ये वेगवेगळ्या फळबागांच्या लागवडीपासून तर भाजीपाला पिकांची लागवड ते फुलपिके व इतकेच नाहीतर मसाल्याच्या पिकांचे देखील भरपूर उत्पादन मिळवताना आपल्याला दिसून येत आहे.
याच मुद्द्याला धरून जर आपण जुन्नर तालुक्यातील राजुरी तसेच आळे, बेल्हे व मांजरवाडी सारख्या गावच्या शेतकऱ्यांचा विचार केला तर या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती पद्धत झुगारून देऊन आधुनिक शेती पद्धतीची कास धरली व तंत्रज्ञानाचा वापर करून मागच्या वर्षापासून मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड करायला सुरुवात केली.
विशेष म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून पिकवलेली दर्जेदार केळी आता इराक, इराण व ओमान सारख्या आखाती देशांमध्ये निर्यात होऊ लागली असून त्या ठिकाणी उत्तम असा बाजारभाव जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळत आहे. चांगला दर मिळत असल्याने आता केळी पिकामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे अर्थकारण देखील आता बळकट होऊ लागले आहे.
जुन्नर तालुक्यातील दर्जेदार केळी पोहोचली आखाती देशात
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जुन्नर तालुक्यातील बेल्हे तसेच राजुरी, मांजरवाडी, आळे व साकोरी परिसरातील शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करत मागच्या वर्षापासून केळीची शेती सुरू केली.
योग्य व्यवस्थापन ठेवून दर्जेदार स्वरूपाचे केळीचे उत्पादन घेतले व ही केळी थेट इराण, इराक व ओमान सारख्या देशांना निर्यात केली असून त्या ठिकाणी केळीला चांगला बाजार भाव मिळाला आहे. त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला आता बळकटी मिळाली असून योग्य नियोजनाने भरघोस उत्पादन मिळवणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे.
जवळजवळ या सगळ्या परिसरामध्ये 250 ते 300 एकर क्षेत्रामध्ये केळीचे पीक घेतले जात असून इंदापूर भागातील ज्या काही एक्स्पोर्ट करणाऱ्या कंपन्या आहेत त्या येऊन थेट केळी बागाची पाहणी करून केळीची खरेदी करत आहेत.
या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून नवीन लावलेल्या म्हणजेच नवती केळीला 26 ते 29 रुपये प्रतिकिलो तर खोडवा केळीला 23 ते 24 रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एका एकरमध्ये 35 ते 40 टनापर्यंत केळीचे उत्पादन शेतकरी घेत असून सात ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न या शेतकऱ्यांना आता मिळवणे शक्य झालेली आहे.
अशाप्रकारे केले आहे केळी बागेचे नियोजन
या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी उत्तम पद्धतीने केळी बागेचे नियोजन केले असून पिकाला पाणी व्यवस्थापनासाठी दुहेरी ठिबक पद्धतीचा वापर केला आहे. पिकाची गरज ओळखून पाण्यात विद्राव्य म्हणजेच वॉटर सोल्युबल खतांचा गरजेप्रमाणे पुरवठा करून त्याचा देखील चांगला फायदा शेतकऱ्यांना मिळाला आहे.
वेळोवेळी औषध फवारणी व पोंगे भरणी करून घेतल्यामुळे त्याचा देखील फायदा झाला. जेव्हा जुलै महिन्यामध्ये केळीचे घड बाहेर पडायला लागले तेव्हा बड इंजेक्शन फुटकेअर करून घेतले.
एका केळीच्या घडाला आठ ते दहा केळीच्या फण्या ठेवून बाकी काढून टाकल्या. तसेच पिकावर येणारे रस शोषक किडी व करप्या रोगाच्या नियंत्रणाकरिता आवश्यक असलेल्या फवारण्या वेळेत केल्या.
या सगळ्या व्यवस्थापनामुळे उच्च प्रतीचे निर्यातक्षम असे केळीचे उत्पादन मिळाले. या शेतकऱ्यांना एका एकर करिता जवळपास एक लाख 35 हजार रुपये खर्च आला. मात्र एका एकर मधून त्यांना सहा ते सात लाख रुपयांचा निव्वळ नफा देखील आता मिळणार आहे.