Ahmednagar News : नगर जिल्ह्यात शुक्रवारी (दि.५) रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरासह संपूर्ण जिल्ह्यात हा अवकाळी पाऊस झाला असून, जिल्ह्यातील सर्व ९७ महसुली मंडळांत पावसाची नोंद झाली आहे.
या अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नगर तालुक्यातील खंडाळा येथे या अवकाळी पावसाने शेतकरी द्रौपदाबाई बाजीराव इथापे यांच्या शेतातील हुरड्यात आलेली सुमारे अडीच एकर क्षेत्रातील ज्वारी भुईसपाट झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
यावर्षी पावसाळ्यात पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यात अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर मात्र हिवाळा सुरु झाल्यावर अनेकदा अवकाळी पाऊस झालेला आहे.
नोव्हेंबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नसतानाच पुन्हा शुक्रवारी (दि.५) रात्री जिल्ह्यात सर्वच भागात अवकाळी पाऊस झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात नगर शहर व जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ४४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले होते.
गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ हवामान तर शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला. हा पाऊस शेतात उभ्या गहू, हरभरा, कांदा आदी पिकांसाठी नुकसान दायक ठरणार आहे. पिकांवर रोगराई पसरण्याची शक्यता असून या पावसाने पिकांच्या उत्पादनात घट येणार आहे.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतात हुरड्यात आलेल्या गहू, ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नगर तालुक्यात अनेक गावांत हे चित्र पहावयास मिळत आहे. तालुक्यातील खंडाळा गावच्या शिवारात शेतकरी द्रौपदाबाई बाजीराव इथापे यांच्या शेतातील हुरडयात आलेली सुमारे अडीच एकर क्षेत्रातील ज्वारी भुईसपाट झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या सह इतर शेतकऱ्यांचे ही मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.