कृषी

केंद्र सरकारने फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुरू केली नवीन योजना; काय आहे सरकारचा CDP-SURAKSHA प्लॅटफॉर्म? वाचा माहिती

Published by
Ajay Patil

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे व कृषी क्षेत्राला बळकटी यावी याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येतात व यामध्ये राज्य सरकारच्या योजनांचा देखील समावेश होतो. अशा योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध पिकांच्या लागवडीसाठी व शेतीतील इतर पायाभूत सुविधा उभारणी करिता अनुदान स्वरूपात मदत तसेच कर्ज इत्यादी माध्यमातून  आर्थिक मदत करण्यात येते.

याच पद्धतीने आता केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांकरिता एक नवीन योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे व ही योजना प्रामुख्याने शेतकऱ्यांना अनुदान देण्याशी संबंधित आहे. केंद्र सरकारने सुरू केलेली ही योजना क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजेच सीडीपी अंतर्गत राबविण्यात येणार आहे.

सीडीपी म्हणजेच क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम केंद्र सरकारची एक मोहीम असून या माध्यमातून शेतकऱ्यांना बागायती पिकांच्या लागवडीकरिता प्रोत्साहन दिले जात असून त्याकरिता एक व्यासपीठ म्हणजेच प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेले आहे व त्यालाच सीडीपी सुरक्षा असे नाव देण्यात आले आहे.

 काय आहे केंद्र सरकारचे सीडीपी सुरक्षा प्लॅटफॉर्म?

केंद्र सरकारच्या माध्यमातून आता या सीडीपीद्वारे देशातील जे काही बागायती पिके आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले जाणार असून गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांचा कल देखील मोठ्या प्रमाणावर बागायती पिकांकडे वळला आहे. त्यामुळे आता सीडीपी सुरक्षा या डिजिटल प्लेटफॉर्मच्या माध्यमातून देशातील बागायतदार शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान हे सहजपणे व कमीत कमी वेळेत मिळणार आहे

तसेच मिळणारे अनुदानाचे पैसे ई रुपी व्हाउचरच्या माध्यमातून बागायतदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. एनपीसीएल अर्थात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून ई रुपी सुरू करण्यात आलेले असून याच्या मदतीने ऑनलाइन व्यवहार सहजपणे करता येतात. त्यामुळे आता या सीडीपी सुरक्षा पोर्टलच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे  ई रुपी स्वरूपामध्ये देणार आहे.

 सीडीपी सुरक्षा पोर्टलची काम करण्याची पद्धत कशी आहे?

हे पोर्टल दुकानदार, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ, शेतकरी आणि क्लस्टर डेव्हलपमेंट एजन्सी यांना एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण काम करते व आता बऱ्याच ठिकाणी ऑनलाइन पद्धत असल्यामुळे शेतकऱ्यांना कमी वेळेमध्ये अनुदानाचा लाभ या माध्यमातून मिळणे आता शक्य झाले आहे.

यामध्ये शेतकरी त्यांच्या मोबाईल नंबरचा वापर करून या सीडीपी सुरक्षा पोर्टल प्लॅटफॉर्मवर लॉगिन करू शकतात. शेतकरी या पोर्टलवर लॉगिन करतील व त्यानंतर फलोत्पादन शेतकरी येथून बियाणे, रोपे ऑनलाईन ऑर्डर करू शकणार आहेत. शेतकऱ्यांनी या माध्यमातून ऑर्डर दिल्यानंतर जे काही शेतकरी रक्कम भरतील त्यानुसार पोर्टलवर सरकारकडून अनुदान दिले जाईल.

 शेतकऱ्यांना या माध्यमातून बँक खात्यात कसे मिळतील पैसे?

तेव्हा शेतकरी एखादी ऑनलाईन ऑर्डर देतील तेव्हा संबंधित ऑर्डरचा माल शेतकऱ्यांच्या पत्त्यावर पोहोचेल व त्यानंतर शेतकऱ्यांनी जिओ टॅगिंगद्वारे ऑनलाईन ऑर्डर केलेल्या मालाचा फोटो आणि त्याचा व्हिडिओ बनवावा आणि तो पोर्टलवर अपलोड करणे गरजेचे राहील.

फोटो पोर्टलवर अपलोड केल्याबरोबर पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. सध्या राष्ट्रीय स्तरावर या प्लॅटफॉर्मचे अनावरण झालेले असून सीडीपी सुरक्षा प्लेटफॉर्मवर आतापर्यंत 84 शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आलेली आहे व यामध्ये महाराष्ट्रातील सह्याद्री फार्म्स प्रायव्हेट लिमिटेडमधील 8000 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

तसेच या प्लॅटफॉर्मवर एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा या चार बँकांचा समावेश करण्यात आलेला असून या बँकांच्या माध्यमातून निधी वितरणाकरिता  ई रुपी वाउचर तयार करण्याचे काम केले जाईल.

Ajay Patil