कृषी

चव्हाण बंधूंच्या केळीने घेतली इराकला भरारी! उत्तम नियोजन ठेवून दर्जेदार उत्पादन घेत कमावले लाखो रुपये

Published by
Ajay Patil

Banana Farming:- कुठल्याही पिकाच्या व्यवस्थापनामध्ये जर काटेकोरपणा आणि उत्तम नियोजन ठेवले आणि तंत्रज्ञानाचा वापर केला तर मिळणारे उत्पादन हे दर्जेदार तर येतेच परंतु भरघोस देखील मिळते. अनेक शेतकरी आता खर्च कमीत कमी करून जास्तीत जास्त उत्पादन कशा पद्धतीने मिळवता येईल?

या दृष्टिकोनातून व्यवस्थापन करताना आपल्याला दिसून येतात व अनेक शेतकरी यामध्ये यशस्वी होत असून तंत्रज्ञानाच्या वापराने अगदी कमी क्षेत्रामध्ये देखील लाखो रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळवण्यामध्ये यश संपादन करत आहेत.

अगदी याच पद्धतीने जर आपण माढा तालुक्यातील उपळाई खुर्द या गावचे अतुल चव्हाण आणि अभिजीत चव्हाण या दोन्ही भावांची यशोगाथा बघितली तर त्यांनी उत्तम असे नियोजन ठेवून रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खतांचा अधिक वापर करून निर्यातीला योग्य अशा केळीचे उत्पादन घेतले व त्यांची केळी इराकला निर्यात करण्यात आली असून त्या माध्यमातून चांगले आर्थिक उत्पन्न त्यांना मिळाले आहे.

चव्हाण बंधूंनी घेतली केळीचे दर्जेदार उत्पादन
याबाबत सविस्तर वृत्त असे की, माढा तालुक्यातील अतुल आणि अभिजीत चव्हाण या दोन्ही भाऊ सुशिक्षित आहेत व एक प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांची वडिलोपार्जित 13 एकर शेती आहे व पूर्वी त्यांची एकंदरीत कौटुंबिक पार्श्वभूमी बघितली तर पाण्याची कमतरता होती व त्यामुळे पूर्ण शेतामध्ये फक्त हंगामी स्वरूपाची पिकांचे उत्पादन त्यांचे वडील घेत होते व सोबतीला दूध व्यवसाय करायचे.

परंतु त्यानंतर अतुल व अभिजीत हे कर्ते झाले व त्यांनी नोकरी न करता शेती करण्याचा निर्णय घेतला. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळी पिकांची लागवड करावी हा निश्चय त्यांनी केला व बोअरच्या पाण्यावर द्राक्ष बागाची लागवड केली व सोबतीला ट्रॅक्टर व्यवसाय देखील करू लागले.

त्यानंतर विहीर खोदली व द्राक्ष बागा वाढवल्या. परंतु द्राक्षांचे उत्पादन घेत असताना त्यांनी केळी पिकाकडे वळण्याचा निर्णय घेतला. यावर्षी त्यांनी तीन एकर क्षेत्रावर केळी लागवड करण्याचा निश्चय केला व जी 9 जातीच्या केळीची लागवड बेड पद्धतीने केली. 23 फेब्रुवारी 2024 ला लागवड केलेल्या तीन एकर क्षेत्रामध्ये त्यांनी 16 ट्रॉली शेणखत,

दोन पिशवी कोंबडी खत टाकून एकरी 1000 याप्रमाणे तीन एकर क्षेत्रावर तीन हजार केळीच्या रोपांची लागवड केली. परंतु उन्हाळ्याच्या कालावधीत म्हणजेच एप्रिल व मे महिन्यामध्ये पिकाला पुरेसे पाणी उपलब्ध होत नव्हते व पाणी कमी पडू लागले. त्यानंतर त्यांनी ठिबकचा वापर केला व केळी जतन केली.

परंतु यावर्षीपावसाळा लवकर सुरू झाल्यामुळे केळी पिकाला व्यवस्थित पाणी उपलब्ध झाले. तसेच या केळी पिकासाठी खत व्यवस्थापन करताना त्यांनी रासायनिक खतांचा वापर अत्यल्प प्रमाणात केला व जैविक खते तसेच स्वतः घरी स्लरी तयार केली व ठिबकच्या माध्यमातून पिकाला देण्यावर भर दिला.

अशाप्रकारे उत्तम नियोजन ठेवल्याने अवघ्या दहा महिन्यांमध्ये त्यांची केळी विक्रीसाठी तयार झाली असून एका फणीला तीस ते 32 केळी चांगल्या दर्जाची आली आहेत. परंतु व्यवस्थापनाचा भाग म्हणून त्यांनी एका घडाला 10 ते 12 फण्या ठेवत खताच्या मात्रा वेळेवर देण्यावर भर दिला व कमीत कमी उत्तम व्यवस्थापनामुळे तीस ते पस्तीस किलोचा एक केळीचा घड तयार करण्यामध्ये ते यशस्वी झाले.

ही त्यांनी पिकवलेली दर्जेदार केळी इराकला निर्यात केली असून त्या माध्यमातून उत्तम असे उत्पन्न मिळवले आहे. आता भविष्यात आणखी केळीचे क्षेत्र वाढवण्याचा त्यांचा मानस असून या तीन एकर केळी पिकातून आलेला अनुभव व अडचणी लक्षात ठेवून योग्य ते व्यवस्थापन ठेवून निर्यातक्षम केळी उत्पादन घेण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Ajay Patil