सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मुसळधार पाऊस सुरू असून बऱ्याच ठिकाणी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाल्याचे सध्या स्थिती आहे. तसेच जोराचा पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे अनेक पिकांवर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव देखील या कालावधीत दिसून येण्याची शक्यता आहे.
यामध्ये जर आपण खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेले कपाशी पिकाच्या दृष्टिकोनातून बघितले तर अशा जास्त पावसामध्ये कपाशी पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये कपाशीची रोपे सुकून रोपांची मर होते व मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये देखील घट येण्याची शक्यता असते.
आपल्याला माहित आहे की बऱ्याच ठिकाणी जेव्हा पाऊस उघडतो तेव्हा कपाशीच्या शेतामध्ये अचानक झाडे जागेवर सुखायला लागतात व याला आकस्मिक मर असे देखील म्हणतात. यामध्ये जेव्हा पाण्याचा ताण पडतो तेव्हा जमिनीचे तापमानात वाढ झालेली असते.
वाढलेल्या तापमानाच्या कालावधीत जर पिकाला पाणी दिले किंवा पाऊस पडला तर झाडाला अचानक हिट म्हणजेच धक्का बसतो व झाड सुकते. तसेच कालांतराने झाडाची पाने देखील खाली गळून पडतात.
अशाप्रकारे या रोगामुळे झाड सुकल्यानंतर पानगळ होते व झाडे मरल्याने खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादनात घट येते. त्यामुळे मर रोग टाळण्याकरिता ताबडतोब महत्त्वाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.
कपाशी पिकांमधील मररोग टाळण्यासाठी करा या उपाययोजना
कपाशी पिकांमधील येणारा मर रोग टाळायचा असेल तर सगळ्यात अगोदर शेतामध्ये पाणी असेल तर त्याचा लवकर लवकर निचरा कसा होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे गरजेचे आहे. पाण्याचा निचरा झाल्यानंतर जेव्हा वाफसा स्थितीत जमिन येते तेव्हा पटकन कोळपणी आणि खुरपणी करणे महत्त्वाचे आहे.
त्यानंतर शक्य तितक्या लवकर 200 ग्रॅम युरिया+ 100 ग्रॅम पांढरा पोटॅश म्हणजेच 00:00:50 हे खत व त्यासोबत 25 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याचे द्रावण तयार करावे व या द्रावणाची प्रत्येक झाडाला 100 मिली याप्रमाणे आळवणी करावी किंवा एक किलो 13:00:45 हे खत व त्यासोबत दोन ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड+ 250 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड 200 लिटर पाण्यातून मिसळून द्रावण तयार करावे.
या द्रावणाची प्रत्येक झाडाला 100 मिली प्रमाणे आळवणी करावी. तसेच जेव्हा या द्रावणाची कपाशीच्या झाडाला आळवणी कराल तेव्हा ती आळवणी केल्यानंतर चे कपाशीचे झाड वाळत असेल त्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबावी.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे सांगितलेले उपाय तुमच्या शेतामध्ये जर झाडे वाळू लागल्याचे दिसल्यास लवकरात लवकर म्हणजेच 24 ते 48 तासाच्या आत करणे गरजेचे आहे.