Cotton Farming : महाराष्ट्रात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कापसाच्या उत्पादनात विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशचा मोठा सिंहाचा वाटा आहे. एका आकडेवारीनुसार राज्यात उत्पादित होणाऱ्या एकूण कापसापैकी जवळपास 78 टक्के कापूस हा विदर्भात उत्पादीत होतो. विशेष म्हणजे कापूस हे एक नगदी पीक आहे. मात्र कापसाला अनेकदा बाजारात कमी दर मिळतो.
परिणामी शेतकऱ्यांचीं आर्थिक कोंडी होते. यामुळे आता कापसावर प्रक्रिया करून विक्री करणे हा पर्याय शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकतो असे तज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत आता कापूस उत्पादक पट्ट्यात स्मार्ट कॉटन प्रकल्प राबवला जाणार आहे.
एका गावातील शेतकरी बांधवांनी एकाच कापूस वाणाची लागवड करावी, जेणेकरून निर्यातक्षम दर्जाचा कापूस उत्पादित होईल आणि शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल म्हणून राज्यातील प्रमुख 12 कापूस उत्पादक जिल्ह्यात हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अंतर्गत राज्यातील प्रमुख 12 कापूस उत्पादक जिल्ह्यातील 35 तालुक्यात हा प्रकल्प राबवला जाणार आहे.
या प्रकल्पाचे ब्रीद वाक्य एक गाव एक वाण असं ठेवण्यात आल आहे. वर्धा जिल्ह्यात देखील हा प्रकल्प राबवला जात असून जिल्ह्यातील देवळी, कारंजा, आष्टी या तीन तालुक्यातील 45 गावांमध्ये या उपक्रमाची सुरुवात झाली आहे.आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा प्रकल्प कॉटन फेडरेशन आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबवला जात आहे.
विशेष म्हणजे या प्रयोगाच्या माध्यमातून एकचं कापूस वाण लागवड करून उत्पादित झालेल्या कापसाचे गाठीत रूपांतर केले जाणार आहे. या तयार झालेल्या गाठी ऑनलाईन पद्धतीने विक्री होणार आहेत. यातून मिळणारा पैसा हा शेतकऱ्यांना उत्पादनानुसार वर्ग केला जाणार आहे. साहजिकच यामुळे व्यापारी व दलाली यांचीं मक्तेदारी कुठे ना कुठे कमी होणार आहे.
निश्चितच या उपक्रमाच्या माध्यमातून कापूस उत्पादकांना चांगला मोबदला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यासाठी संत गजानन माउली जिनिंग प्रेसिंग पुलगाव, कारंजा तालुक्यासाठी विदर्भ कोट फायर, तर आष्टी तालुक्यासाठी एम. आर. जिनिंग तळेगाव यांची या प्रकल्पाकरिता निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सहभागी गावामधील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून एकजिनसी कापसाची लागवड केली आहे. यामध्ये शेतकरी बचत गटांचा देखील समावेश आहे.
स्मार्ट कॉटन प्रकल्पाची थोडक्यात माहिती
हा प्रकल्प कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी राबवण्यात येत आहे. यामध्ये सर्वच घटकांतल्या शेतकऱ्यांना पुरेसे प्रतिनिधित्व दिले जात आहे. हा प्रकल्प राबवण्यासाठी कृषी विभागामार्फत कार्यशाळा घेतली जाते. मग एक गाव, एक वाण या संकल्पने अंतर्गत एका जातीच्या कापसाची लागवड केली जाते. एका शेतकरी समूहासाठी एक लीड रिसोर्स पर्सन नेमला जातो व त्याला प्रशिक्षित केले जाते.
या प्रकल्पद्वारे कापूस पेरणीपासून ते गाठी तयार होईपर्यंत सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवले जाईल व त्याची तपासणी केली जाणार आहे. उत्पादीत झालेला कापसाच्या प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून गाठी तयार केल्या जाणार आहेत. यानंतर या गाठी विकल्या जातील आणि आलेल्या मोबदल्यात उत्पादनानुसार वाटा करून शेतकऱ्यांना पैसे दिले जातील.
या गाठी ऑनलाईन विकल्या जाणार असल्याने यांना रास्त भाव मिळणार आहे. तसेच गाठी तयार झाल्यानंतर उरलेल्या सरकिला देखील चांगला दर मिळेल आणि त्याचे अतिरिक्त उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार आहे. निश्चितच यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे. एका गावातील कापूस उत्पादक एकाच वाणाची पेरणी करणार असल्याने यामुळे त्यांच्या उत्पादन खर्चात देखील बचत होऊ शकते असा दावा केला जात आहे.
म्हणजे कृषी विभागाच्या माध्यमातून राबवला जाणारा हा प्रकल्प काहीसा गट शेती सारखाच आहे. पण प्रकल्पला कृषी विभागाचे मार्गदर्शन लाभणार असल्याने गटशेतीपेक्षा अधिक योग्य नियोजन यामध्ये पाहायला मिळणार आहे.