Cotton News : गेल्या काही वर्षांपासून भारतात सोशल मीडियाचा वापर हा वाढला आहे. कोरोनाच्या काळात याच्या वापराला अधिकच वाव मिळाला. सोशल मीडियामुळे निश्चितच माहितीचे आदान प्रदान सोपे झाले आहे. मात्र या सोशल मीडियामुळे काही चुकीच्या अफ़वा देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.
काही लोक जाणून बुजून अफवांना पसरवतात. अशीच एक कापूस दरवाढीबाबतची अफ़वा सध्या सोशल मीडियामध्ये झळकत आहे. सोशल मीडियामध्ये सध्या कापसाचे दर 11 ते 15 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत गेल्याचे चुकीचे संदेश वेगाने प्रसारित केले जात आहेत.
खरं पाहता सद्यस्थितीत कापसाला केवळ आठ हजार रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळत आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे जाणकारांचे म्हणणे आहे. कापूस हंगाम सुरू होऊन जवळपास दोन महिने झाले आहेत.
सुरुवातीला कापसाला चांगला दर मिळाला होता मात्र सद्यस्थितीला कापूस दर 9 हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी आहेत. अशातच सोशल मीडियामध्ये दरवाढीची अफवा वेगाने पसरत असल्याने शेतकऱ्यांची दिशाभूल होत आहे.
सोशल मीडियामध्ये तीन-चार प्रकारचे पोस्ट व्हायरल केले जात आहेत. एका पोस्टमध्ये कापसाला पंधरा हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा भाव मिळेल असा दावा करण्यात आला आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये 12000 रुपये प्रति क्विंटल दरात कापूस विक्री होत आहे असं सांगितले जात आहे.
एका पोस्टमध्ये एका यूट्यूब चैनलची लिंक टाकण्यात आली असून ही लिंक गेल्या वर्षीची आहे. या अफवांमुळे शेतकरी संभ्रमात आहे. व्यापाऱ्यांच्या मते, यंदा कापूस दर आता सध्या ज्या स्थितीत आहेत त्याच स्थितीत राहणार आहेत. निश्चितच व्यापाऱ्यांचा हा त्यांचा वैयक्तिक अंदाज आहे.
काही जाणकारांनी मात्र सीसीआयने खुल्या बाजारातून कापूस खरेदी सुरू केली असल्याने दराला आधार मिळेल असे नमूद केल आहे. मात्र कापसाचे दर नेमके किती वाढतील याबाबत कोणीच भविष्यवाणी केलेली नाही. अशी दरवाढीची भविष्यवाणी देखील कोणी करू शकत नाही.
त्यामुळे शेतकरी बांधवांनी अफवांवर विश्वास न ठेवता आपल्याला परवडेल असा दर मिळाला तर कापसाची टप्प्याटप्प्याने विक्री करणे हे त्यांच्यासाठी फायद्याचे राहणार आहे. काही प्रतिष्ठित मीडियारिपोर्टमध्ये कापूस दरवाढीला दुजोरा दिला असला तरी देखील किती दर वाढतील याबाबत कोणीही काही सांगितलेले नाही.
यामुळे शेतकरी बांधवांनी सोशल मीडियावर कापूस दरवाढीच्या पसरत असलेल्या अफ़वावर विश्वास ठेवण्याऐवजी महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेल्या बाजारभावाची माहिती घेऊन आपले विक्रीचे नियोजन आखणे हे त्यांच्यासाठी योग्य राहणार आहे.