कृषी

Cotton Seeds: कापूस बियाण्याची 16 मे पूर्वी विक्री केली तर होणार थेट कारवाई कारण की…

Published by
Ajay Patil

Cotton Seeds:- खरीप हंगाम आता काही दिवसांवर येऊन ठेपला असून त्यामुळे आता शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागल्याचे सध्या चित्र आहे. महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात प्रामुख्याने कपाशी आणि सोयाबीन या दोन पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.

यामध्ये कपाशी पिकाच्या अनुषंगाने बघितले तर महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश सारख्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर कपाशीची लागवड केली जाते. कपाशी लागवड करताना पाण्याची उपलब्धता असेल तर शेतकरी मे महिन्याच्या सुरुवातीला किंवा मध्यावधीत कपाशी लागवड करण्याला प्राधान्य देतात.

परंतु एकंदरीत काही वर्षांचा विचार केला तर मोठ्या प्रमाणावर कपाशी पिकावर शेंदरी बोंड आळी चा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचे आपल्याला दिसून येते. या बोंड आळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशी पिकाच्या अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसत असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे या बोंडअळीच्या बंदोबस्तासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कपाशी लागवड केव्हा करावी या गोष्टीला देखील खूप महत्व आहे. याकरिता आता कृषी विभागाच्या माध्यमातून कापूस बियाणे 16 मे पूर्वी विकण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.

 कापूस बियाणे 16 मे पूर्वी विकल्यास होणार कारवाई

याबाबत सविस्तर वृत्त असे की, खरीप हंगामामध्ये शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता क्षेत्रिय पातळीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत असून याचाच भाग म्हणून 16 मे 2024 पासून कापसाचे बियाणे लागवडीसाठी उपलब्ध होणार आहे.

परंतु त्या अगोदर जर कपाशीच्या बियाण्याची विक्री केली तर संबंधित कंपनी आणि विक्रेत्यांवर कारवाई होईल व या संदर्भात कृषी विभागाच्या माध्यमातून विभागीय कृषी सहसंचालक यांना आदेश देण्यात आले आहेत. राज्यामध्ये 2017 या वर्षीच्या खरीप हंगामातील शेंदरी बोंड अळीच्या प्रादुर्भावाचा जो काही अनुभव आला होता तो लक्षात घेऊन कृषी विभागाने त्यानंतर ज्या उपाय योजना राबवल्या त्यामुळे शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव अत्यल्प प्रमाणात आढळून आला.

त्यामुळेच आता कापूस बियाणे 16 मे पूर्वी विकता येणार नाहीत अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत. याबद्दल जर आपण कृषी शास्त्रज्ञांचे मत पाहिले तर त्यांच्या मते बोंडअळीचा जीवनक्रम खंडित न झाल्यामुळे तिचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतो.

जर हंगामाच्या आधी म्हणजे हंगामपूर्व कपाशी पिकाची लागवड केली तर बोंड अळीच्या जीवन क्रमाला पोषक वातावरण तयार होऊन तिचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता बळावते. त्यामुळे आता कृषी विभागाच्या माध्यमातून अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेला आहे.

Ajay Patil