Agricultural News : उन्हाची तिव्रता वाढल्यामुळे बोअरवेल व विहिरींची पाण्याची पातळी खोल गेली आहे. पाणीपातळी खाली गेल्याने तालुक्यासह तरवडी, कुकाणा, अंतरवाली, जेऊर, देवगाव, सुकळी, नांदूर, वडूले, चिलेखनवाडी, देवसडे आदी भागातील पिके सुकू लागली असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
परिसरातील शेतात उभी असलेली मका, गहू, हरभरा हे पिके शेवटच्या पाण्यावर आली आहेत. परंतु पाणी पातळी खोल गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जाण्याची चिन्हे दिसत आहे. दीड महिन्यापूर्वी मुळा उजवा कालव्याचे आवर्तन सुटले होते. हे आवर्तन सुटून देखील दीड महिन्यातच पाणी पातळी खोल गेली आहे.
त्यामुळे या भागातील प्रगत बागातदार पाणी वापर संस्था, न्यामत शहावली बाबा पाणी वापर संस्था, सावित्रीबाई फुले पाणी वापर संस्था, गणराया पाणी वापर संस्था, सावता पाणी वापर संस्था, पावन हनुमान पाणी वापर संस्था, मारुतराव घुले पाटील पाणी वापर संस्था, नाथ पाणी वापर संस्था, भाईनाथ बाबा पाणी वापर संस्था, खंडेश्वरी पाणी वापर संस्था आदीसह परिसरातील अनेक संस्थांनी तातडीने मुळा उजव्या कालव्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे.
मागील दोन वर्षापासून अतिवृष्टी, गारपीट आदीमुळे शेतकऱ्यांची कोंडी झालेली आहे. यावर्षी हातातोंडाशी आलेले पीक पाण्याअभावी सुकू लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे. त्यामुळे वरील पाणी वापर संस्था व परिसरातील शेतकऱ्यांकडून तातडीने मुळा उजव्या कालव्याचे आवर्तन सोडण्याचे मागणी होत आहे.
नेवासा तालुक्यात गहू, हरभरा, ऊस, मका, आदी पिकांना शेवटे पाणी देण्यापुर्वीच विहिरीच्या पाणी पातळीने तळ गाठल्याने मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. आवर्तन सोडल्यास शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळू शकते. निवडणूकीच्या धामधूमीत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बगल दिला जात आहे. आवर्तन सोडण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे. –सोमनाथ कचरे, आम आदमी पार्टी कार्यकर्ते.