कृषी

Deshi Gram Crop Variety: रब्बी हंगामात करा हरभऱ्याच्या ‘या’ देशी वाणांची लागवड! मिळेल भरपूर उत्पादन आणि पैसा

Published by
Ajay Patil

Deshi Gram Crop Variety:- रब्बी हंगामामध्ये जर आपण दाळवर्गीय पिकांच्या दृष्टिकोनातून बघितले तर हरभरा हे पीक प्रमुख असून मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात हरभरा लागवड केली जाते. तसेच बरेच पिकांमध्ये आंतरपीक म्हणून देखील हरभरा लागवड फायद्याची ठरते.

जमीन जर काळीची असेल तर या जमिनीमध्ये उपलब्ध ओलाव्यावर देखील हरभऱ्याचे उत्तम पिक येते व दर्जेदार आणि जास्त उत्पादन देणारे वाण लागवडीकरिता वापरले तर निश्चितच त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो.

यामध्ये जर देशी हरभऱ्याच्या वाणाची लागवड केली तर कमी पाण्यात देखील या वानांपासून चांगले उत्पादन मिळते आणि देशी वानांमध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची देखील क्षमता असते. तसे पाहायला गेले तर महाराष्ट्र मध्ये प्रामुख्याने देशी हरभरा लागवड खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते व याच दृष्टिकोनातून आपण हरभऱ्याचे काही महत्त्वाचे चांगले उत्पादन देणारे देशी वानांबद्दलची माहिती बघणार आहोत.

 हे आहेत हरभऱ्याचे उत्तम उत्पादन देणारे देशी वाण

1- विजय हा हरभऱ्याचा देशी वाण असून भरघोस उत्पादन देण्यासाठी प्रसिद्ध असून यामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता चांगली आहे. महत्त्वाचे म्हणजे हरभरा पिकावरील मर रोगास प्रतिकारक्षम असून जिरायती तसेच बागायत लागवडीसाठी योग्य वाण म्हणून ओळखला जातो.

जिरायती मध्ये लागवड केली तर साधारणपणे 85 ते 90 दिवसात काढणीस येतो व बागायतीत 105 ते एकशे दहा दिवसात काढणीस येतो. जिरायती क्षेत्रामध्ये 14 ते 15 क्विंटल सरासरी उत्पादन मिळते तर बागायतीमध्ये सरासरी उत्पादन 23 क्विंटल पर्यंत मिळू शकते व उशिरा पेरणी केली असेल तर सरासरी उत्पादन 16 क्विंटल पर्यंत मिळते.

2- फुले विश्वराज लागवडीनंतर हरभऱ्याचा हा देशी वाण साधारणपणे 95 ते 105 दिवसात काढणीस येतो व या वाणाची वैशिष्ट्ये म्हणजे याची दाणे मध्यम आकाराची असतात व पिवळसर तांबूस रंग असतो.

साधारणपणे जिरायत पेरणीसाठी योग्य वाण असून मर रोगास प्रतिकारकक्षम आहे आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रसारित करण्यात आलेला आहे. सरासरी उत्पादन क्षमता हेक्टरी 15 क्विंटल पर्यंत आहे.

3- आकाश( बीडीएनजी-797)- लागवडीनंतर परिपक्वता कालावधी म्हणजेच काढणीचा कालावधी 105 ते 110 दिवसांचा असून मराठवाडा विभागासाठी प्रसारित करण्यात आलेला वाण आहे. महत्वाचे म्हणजे हा वान मर रोगास प्रतिकारक्षम असून दाणे मध्यम आकाराचे आहेत. हेक्टरी उत्पादन क्षमता बघितली तर जिरायतीमध्ये 14 ते 15 क्विंटल आणि बागायतीमध्ये वीस ते 22 क्विंटल पर्यंत आहे.

4- दिग्विजय लागवडीनंतर साधारणपणे जिरायती क्षेत्रात नव्वद ते 95 दिवसात काढणीस येतो तर बागायतीमध्ये 110 ते 115 दिवसात काढणीस येतो. मर रोगास प्रतिकारक्षम वान असून जिरायती, बागायती आणि उशिरा पेरणीसाठी योग्य वाण आहे.

मिळणारे उत्पादन बघितले तर जिरायती मध्ये हेक्टरी 14 क्विंटल तर बागायती मध्ये हेक्टरी ते वीस क्विंटल पर्यंत उत्पादन देण्यास सक्षम आहे व उशिरा पेरणी असेल तर सरासरी हेक्टरी उत्पादन 21 क्विंटल पर्यंत मिळते.

5- विशाल बागायतीमध्ये लागवड केली असेल तर 110 ते 115 दिवसात काढणीस येतो व त्याचे आकर्षक पिवळसर टपोरे दाणे असतात व मर रोगास प्रतिकारक्षम आहे. हरभऱ्याच्या या वाणाची घाटी आकाराने मोठे असून गर्द हिरव्या रंगाचे असतात. येणारे उत्पादन बघितले तर जिरायतीमध्ये हेक्टरी 13 क्विंटल आणि बागायतीमध्ये हेक्टरी वीस क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते.

Ajay Patil