बैलजोडीसह मशागतीचा खर्च वाढला ! सालगडीही लुप्त, दुधासह कांद्याला भाव मिळेना, शेतकऱ्यांची ‘दीन’ अवस्था

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खरिपासह रब्बी हंगामानेही साथ न दिल्यामुळे यंदा शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यातच सालगडी, बैलजोडीसह मशागतींचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत मोठी भर पडली आहे. या शिवाय कांदा व दूध, तसेच इतरही शेतीमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

गत वर्षीच्या खरीप, तसेच रब्बी हंगामात पावसाचे प्रमाण खूपच कमी होते. त्याचा परिणाम कांदा बाजरी, तूर, तसेच इतरही भाजीपाला पिकांवर परिणाम झाला. त्यातच या शेतीमालाला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांचा त्यातून उत्पादन वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

त्यानंतर रब्बी हंगामातही गहू, ज्वारी, हरभरा पिकांनीही साथ न दिल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे शेतकरी जेरीस आले आहेत. शेतात काम करण्यासाठी मजुरांचीही वानवा आहे. पूर्वी बहुतेक शेतकरी शेतीच्या कामासाठी वर्षभरासाठी एक मजूर ठेवत असे, त्यास सालगडी म्हणत आता तेही मिळेनासे झाले आहेत.

या सालगड्यांचे साधारणपणे गुढीपाडव्यापासून साल (वर्ष) सुरू व्हायचे. हे सालगडी संबंधित शेतकऱ्यांकडून आपल्या घरखर्चासाठी उचल घेत असत व त्यानंतर वर्षभर तो सालगडी त्या शेतकऱ्यांची घरी काम करत असे.

आता निसर्गचक्राच्या बदलाने शेतीमालाच्या बाजारभावाच्या चढउताराने, तसेच पर्जन्यमान कमी-कमी होत असल्याने शेतीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा आता सालगडी ठेवणे परवडत नाही. त्याच बरोबर सालगड्यांनाही इतरत्र सालगडी राहून मिळणाऱ्या रकमेपेक्षा अधिक मजुरी मिळत आहे

त्यामुळे सालगडी सुद्धा मिळत नाहीत. शेतीत यांत्रिकीकरण वाढले आहे. इतकेच नव्हे, तर दिवसेंदिवस शेती करणे सुद्धा कठीण होत चालले आहे. त्याचबरोबर पशूपालन करणेही शक्य होत नाही

५० हजारांचा खर्च
शेतकऱ्याला प्रत्येकवेळी शेतीच्या मशागतीसाठी खर्च करावा लागतो. शेतकऱ्यास दरवर्षी नांगरणी, रोटाव्हेटर, पेरणी, बी-बियाणे, खते, खुरपणी, वखरणी व मळणी असा एकरी सुमारे ५० हजारांवर खर्च येतोच. दरम्यान दुसरीकडे ट्रॅक्टरवाल्यांनी नांगरणीचे दर वाढवले असून, नऊशे ते एक हजार रुपये

तर शेणखत सहा ते सात हजार रुपये ट्रॅक्टर ट्रॉलीप्रमाणे घ्यावे लागते. पाऊसवेळेवर होत नाही. शेतीमालाला बाजारभाव नाही त्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून येत आहेत.