Super Gold Custard Apple Cultivation:- महाराष्ट्रामध्ये सध्या फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढली असून दिवसेंदिवस फळबाग लागवड क्षेत्रामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे.
त्यातल्या त्यात गेल्या काही वर्षापासून अनेक उच्चशिक्षित तरुणांनी शेतीमध्ये पाऊल ठेवल्याने त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग शेतीमध्ये अवलंबले असून तंत्रज्ञानाची मदत घेऊन असे प्रयोग यशस्वी देखील केले आहेत.
शेतीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर फळबाग, विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड, शेडनेट सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या फुलांचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेऊ लागले आहेत.
तसेच सोशल मीडियाच्या या युगामध्ये युट्युब सारख्या माध्यमांचा देखील शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होताना दिसून येत आहे. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण सोलापूर जिल्ह्यात असलेल्या नान्नज या गावचे रहिवासी असलेले प्रवीण गवळी या तरुणाची यशोगाथा बघितली तर ती इतर तरुणांना प्रेरणादायी अशी आहे. प्रवीण याने youtube वरून माहिती घेऊन अडीच एकर क्षेत्रात सुपर गोल्ड सिताफळ वाणाची लागवड करून लाखोंचा नफा सिताफळ शेतीतून मिळवला आहे.
सुपर गोल्ड सिताफळ जातीची लागवड या शेतकऱ्याला ठरली वरदान
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोलापूर जिल्ह्यात असलेल्या नान्नज या गावचे रहिवासी असलेले प्रवीण गवळी यांचे दहावीपर्यंत शिक्षण झालेले आहे. परंतु शेतीत आवड असल्याने व शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन वेगवेगळे प्रयोग करण्याची त्यांना मोठ्या प्रमाणावर आवड आहे.
गेल्या पाच वर्षांपूर्वी त्यांनी शेती करायचे ठरवले.सुरुवातीला शेतीमध्ये काय करावे हा प्रश्न असताना त्यांनी युट्युब आणि इंटरनेट सारख्या सोशल मीडियाची मदत घेतली व या माध्यमातून त्यांना सिताफळाच्या सुपर गोल्डन जाती विषयी माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी काही शेतकरी आणि कृषी तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन सुपर गोल्ड जातीच्या सिताफळाची लागवड केली.
सीताफळाची ही जात चवीला गोड तर असतेच.परंतु त्याचे फळ आकाराने मोठे असते व त्यामुळे ग्राहकांमध्ये चांगली मागणी दिसून येते. इतकेच नाही तर सुपर गोल्ड सिताफळ जातीच्या सिताफळाची टिकवण क्षमता देखील चांगली असल्याने काढणीनंतर ते 9 ते 8 दिवस आरामात टिकते. त्यामुळे विक्रीचे नियोजन करणे सोपे जाते.
प्रवीण यांच्या शेताच्या बांधावर येऊन व्यापारी सीताफळाची खरेदी करतात.सुपर गोल्ड जातीच्या एकेका फळाचे वजन 300 ते 500 ग्रॅम पर्यंत असते व एका झाडावर 50 ते 60 सिताफळे लागतात.
साधारणपणे सुपर गोल्ड सिताफळाच्या जातीचे एक झाड 50 किलोपर्यंत उत्पादन देण्यास सक्षम असते. सध्या सुपर गोल्ड जातीच्या सीताफळाला 70 रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. प्रवीण यांची सीताफळ शेती पाहिली तर जवळपास त्यांनी 50 हजार रुपये खर्च सिताफळ बागेसाठी केला असून पहिल्या तोड्यातच त्यांना खर्च वजा जाता 70 हजार रुपयांचा नफा मिळाला आहे.
यापुढे आणखी दोन तोडे होतील असा अंदाज असून त्या माध्यमातून सर्व मिळून तीन लाख रुपये पर्यंत उत्पन्न मिळेल असे देखील प्रवीण यांनी सांगितले.सुपर गोल्ड सिताफळ जातीचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी कमीत कमी पाण्यामध्ये देखील सुपर गोल्ड जातीच्या सिताफळाचे उत्पादन चांगले येते. ही जात कमी खर्चात जास्त नफा देणारी असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायद्याची आहे.