Agricultural News : दसरा सण साजरा केल्यानंतर ऊसतोड कामगारांनी कुटुंबासह साखर कारखान्यांच्या दिशेने धाव घेतली आहे. कारण १ नोव्हेंबरपासून ठिकठिकाणच्या साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु झाले आहेत.
त्यामुळे उसतोडणी कामासाठी हे कामगार रवाना झाले आहेत. मुकादमाकडून अगोदरच ऊसतोड कामगार उचल घेतात. त्यानंतर साखर कारखान्यास जाऊन ऊस तोडीच्या कामातून हे पैसे फेडले जातात.
यावर्षी ऊसाचे क्षेत्र घटल्याने ऊस तोढण्यासाठी साखर कारखान्यांची चढाओढ लागणार आहे. अधिकाधिक ऊस कारखान्यास मिळावा, यासाठी प्रयत्न राहणार असल्याने तत्काळ गळीत हंगाम सुरु करण्याकडे कारखान्यांचा कल आहे.
बहुतांशी कारखाने १ नोव्हेंबर पासून सुरु झाले आहेत. तेव्हा घरदार मागे टाकून या कामगारांना उचल घेतलेल्या कारखान्याकडे धाव घ्यावी लागली आहे, त्यामुळे त्यांची दिवाळी उसाच्या फडातच जाणार आहे.
विविध गावांतून अनेक मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी परजिल्हयातून उस पट्टयात दाखल झाली आहेत, एकीकडे घरोघरी आकाश कंदील, लाइटिंगचा झगमगाट, फटाक्यांची आतषबाजी, घरोघरी बनवलेले खमंग खाद्यपदार्थांची मेजवाणी राहणार असली तरी, उसतोड कामगारांची दिवाळी मात्र ऊसाच्या फडातच होणार आहे.
हे मजूर ऊन, वारा, पाऊस, थंडी, या कशाचीही परवा न करता कष्टाचे व कसरतीचे काम करतात. या कामगारांचा संपूर्ण दिवस ऊसाच्या फडातच जातो. पोटासाठी संघर्ष आमच्या पाचवीला पुजला असल्याचे त्यांनी सांगितले.
गळीताचा हंगाम पूर्ण होईपर्यंत रात्रंदिवस काबाडकष्ट करत, ऊसाच्या फडालगतच्या परिसरात राहूटी टाकून राहतात. आलेला दिवस कष्टाचा, अशीच त्यांची दिनचर्या ! गावापासून कोसो दूर रानावनात राहून कष्ट करणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या जीवनात दिवाळीची पहाट कधी येणार ? हा प्रश्न आहे.
एकीकडे लख्ख प्रकाशाने उजळून निघणारी गावे व शहरे तर दुसऱ्या बाजूला काळोखात जगण्याच्या लढाईसाठी दररोज दोन हात करणारे ऊसतोड कामगार, अशी दरी आहे. रोजच कष्टाचे काम करावे लागत असल्याने समाधानाची झोप मात्र लागते, आम्हाला काम केल्याशिवाय पर्याय नाही, असे ऊसतोड मजुरांनी सांगितले.