पावसाचा मोठा खंड पडल्याने दुष्काळसदृश परिस्थिती ! शेतकरी हवालदिल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : कर्जत-जामखेड तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला असून, गेल्या महिनाभरात पावसाचा मोठा खंड पडल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके जळून गेली असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सर्व मित्र पक्ष व शेतकरी बांधवांनी एकत्र येत सरकारकडून मदत मिळावी, यासाठी दोन्ही तालुक्यातील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत कर्जत -जामखेड मतदारसंघात शेतकऱ्यांनी तूर, कापूस, मका, बाजरी, उडीद, मूग व सोयाबीन, या पिकांचा विमा काढल असून,

या सर्व शेतकऱ्यांना २५ टक्के रक्कम पीकविमा संरक्षण म्हणून मिळावी, यासाठी काही दिवसांपूर्वीच आमदार रोहित पवार यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता.

त्याच अनुषंगाने आता ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा करावी, पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्याने दुष्काळ जाहीर करून जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात,

टंचाई असलेल्या गावांमध्ये पाण्याचे टँकर सुरू करावेत, शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना अखंडित वीजपुरवठा करावा, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. याबाबतचे निवेदन दोन्ही तालुक्यातील तहसीलदारांना देण्यात आले आहे.