Agricultural News : ऐन दिवाळीच्या तोंडावर ढगाळ वातावरण आल्यामुळे आतापर्यंत बऱ्यापैकी असलेल्या तुरीच्या पिकावर अचानक शेंगा पोखरणाऱ्या घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला आहे, त्यामुळी पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर, कासार पिंपळगाव, हनुमान टाकळी, परिसरातील तूरउत्पादक शेतकरी त्रस्थ दिसून येत आहे.
कृषी विभागाने याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.तूर हे महाराष्ट्रातील डाळवर्गातील एक प्रमुख पीक आहे. तूर या पिकाचे सरासरी उत्पन्न कमी असते.
या डाळवर्गीय पिकावर पेरणीपासून ते पीक निघेपर्यंत अनेक प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव आढळून आला आहे; परंतु फुले व शेंगावर होणाऱ्या किडीचे आक्रमण अतिशय नुकसानकारक ठरले आहे.
हे नुकसान सर्वात जास्त होत असल्याने उत्पन्नात घट दिसते व चांगल्या प्रतीचे बियाणे तयार होत नाही. कधी कधी साथीच्या स्वरुपात कीड आल्यास ७० टक्के पेक्षाही अधिक नुकसान शेंगा पोखरणाऱ्या या किडीपासून होते.
त्यात शेंगमाशी मुळे ५० ते ६० टक्के नुकसान दाण्यांचे होते. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होऊन ढगाळ हवामानामुळे खरीप हंगामातील तूर पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
त्यापासून संरक्षण करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात यावे. सुरवातीच्या काळात तूर पिकात शेंगा पोखरणारी अळी ही कोवळी पाने, फुले किंवा शेंगा भरताना कोवळे दाणे खातात.
तसेच दाण्यात किड झाल्याने ते उपयोगी पडत नाहीत. कमी कालावधीत येणाऱ्या जाती व जास्त आर्द्रता असलेल्या भागात किडींचा जास्त प्रादुर्भाव दिसतो. परिसरातील शेतकरी सध्या या संकटाशी सामना करीत आहेत.