Agricultural News : उन्हाळ्याचा हंगाम आला की सर्व प्रथम आठवण होते ती कलिंगडाची अर्थात टरबुजाची ! परंतु, या कलिंगड शेतीचे गणितही बेभरवशाचे झाले आहे. शेतकऱ्यांना त्यातून अपेक्षित भाव मिळेल, याची शाश्वती नसल्याने आर्थिक गणित बिघडले आहे. परिणामी बाजारभावातील चढ-उताराने शेतकरी मेटाकुटीला आले आहे.
इतर पिकांपेक्षा कलिंगड शेती ही फार जोखमीची असल्याचे मानले जाते. कारण या पिकाला फळे आल्यानंतर जर एखादा अज्ञात आजार आला, तर रात्रीतून हे पीक हातातून सोडून द्यावे लागते. त्यामुळे या पिकात जोखीम पत्करूनच लागवड करावी लागते. जवळपास एका एकरास एक लाख रुपये खर्च कलिंगड पिकास येत असल्याने त्या प्रमाणात उत्पादन झाले. तरच हे पीक नफ्याचे ठरते. कमीत कमी एकरी वीस ते पंचवीस टन सरासरी उत्पादन मिळाले पाहिजे, असे शेतकरी सांगतात.
या पिकाला थंडीची लाटही मानवत नाही, कारण अतिरिक्त थंडी झाल्यास या पिकाची संपूर्ण सेटिंग बिघडून जाते. दिवसेंदिवस मधमाशांचे प्रमाण कमी होत असल्याने टनेज घटत आहे. त्यामुळे कृत्रिम प्रयोग करावे लागतात. पर्यायाने खर्च वाढतो.
कलिंगड हे पीक पारंपरिक म्हणजे कायम अनुभव असणाऱ्या शेतकऱ्यांनी केले. तर त्यांना काहीच अडचण येत नाही, मात्र कंपनीचे तंत्रज्ञ अथवा इतर मार्गदर्शन घेऊन केल्यास या पिकाच्या उत्पादनवर टनेजवर परिणाम होतो. कलिंगड हे पीक सर्वसाधारण साठ ते पंच्याहत्तर ऐंशी दिवसाचे असते, त्यामुळे त्या पिकास थंडीमध्ये ‘फार जोखीम असते.
कारण या पिकावर मर रोगाचा परिणाम लवकर होतो. त्यामुळे त्याचे टनेज ओपेक्षानुरूप मिळाले तर नशीब अन्यथा तोटाच असे ‘चढ-उताराबरोबर उत्पादनाचे गणित जुळले तरच या पिकात नफा आहे.
शेतकऱ्यांना कष्टाच्या हिशोबाने भाव भेटत नसल्याने कधी कधी हेच कलिंगड कवडीमोल भावात विकावे लागते. नैसर्गिक आपत्ती आणि हवामानाचा अवमेळ यातून बाहेर येऊन कमीतकमी किलोला अठरा ते वीस रुपये भाव मिळाला तर शेतकऱ्यांना परवडते.
कलिंगडाची शेती विक्रीच्या दृष्टीने शक्यतो स्थानिक बाजार पेठेवरच अवलंबून असल्याचे चित्र दिसत असून बाहेरील व्यापारी फारच कमी प्रमाणात आपल्या भागात येत असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांवर अवलंबून रहावे लागत असते. भारतात कलिंगडाची हक्काची बाजारपेठ ही मुंबई, दिल्ली, कलकत्ता, हरियाणा आणि काश्मीर ही असून या ठिकाणचे व्यापारी आले तर भाव चांगले मिळतात.
बांगलादेश हीसुद्धा कलिंगडासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. मात्र केंद्र सरकारने निर्यातबंदी केल्याने याचा फटका कलिंगड उत्पादक सहन करत आहेत.
स्थानिक व्यापारी हे जागेवर येऊन हे पीक घेऊन जातात. मात्र लेबरही त्यांचेच असते त्यांना कमीतकमी पाचशे रुपये मजुरी द्यावी लागते. तसेच व्यापारी शेतकऱ्यांच्या माजबुरीचा फार मोठ्या प्रमाणात फायदा घेत असतात.
कारण या टरबुजाच्या मालाचे वजन करताना टनाला पन्नास किलो सूट घेतात. म्हणजे टनामागे शेतकऱ्याचा ५० किलो तोटा इथेच होतो. म्हणजे वीस टनामागे एक टन तोटा होतो. टरबुजाला आपल्याकडे मोठी बाजारपेठ असल्याने नाईलाजाने स्थानिक व्यापाऱ्यांना जागेवर माल द्यावा लागतो.
■वाटर सोल्युबलच्या किमती भरमसाठ वाढल्या असून २०११ साली या वाटर सोल्युबलची किंमत १५०० होती. ती आज २०२४ ला ५००० रुपये झाली आहे. म्हणजे औषधे व पोषकद्रव्ये यांच्या किमती भरमसाठ वाढल्या, मात्र त्यावेळी टरबुजाला त्यावेळी जे भाव होते आजही तेच भाव आहे.
म्हणजे खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. मात्र टरबुजाचे भाव आजही आहे तेथेच आहेत. त्यामुळे कलिंगड शेती शेतकऱ्यांना जोखमीची झाली आहे. – राजेंद्र अंत्रे, कलिंगड उत्पादक शेतकरी, आंबी-दवणगाव