Pea Crop Cultivation:- कुठल्याही प्रकारच्या भाजीपाला पिकांच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी कालावधीत चांगला पैसा कमावण्याची क्षमता असते.
भाजीपाला पिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हातामध्ये कायम पैसा खेळता राहतो. त्याकरिता भाजीपाला पिकांच्या शेतीकडे आता शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसून येत आहे. त्यातल्या त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात जास्तीचे उत्पादन मिळवत शेतकरी लाखोत देखील आर्थिक नफा मिळवत आहेत.
तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे पीक कोणतेही असो त्या पिकापासून जर भरघोस उत्पादन हवे असेल तर त्या पिकाचे दर्जेदार आणि भरघोस उत्पादन देणाऱ्या वाणाची लागवड खूप महत्त्वाची ठरते.
भाजीपाला पिकाच्या अनुषंगाने बघितले तर यामध्ये वाटाणा लागवड देखील महत्त्वाची ठरते व महाराष्ट्र मध्ये रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर वाटाणा पीक लागवड केली जाते.
त्यामुळे तुम्हाला देखील या रब्बी हंगामामध्ये वाटाणा पिकाची लागवड करायची असेल तर सुधारित आणि दर्जेदार उत्पादन देणाऱ्या वाणाची लागवड करावी. त्यामुळे आपण या लेखात वाटाणा पिकाच्या काही सुधारित जाती बघणार आहोत जे रब्बी हंगामासाठी लागवडीस फायदेशीर आहेत.
या आहेत वाटाणा पिकाच्या चांगल्या उत्पादन देणाऱ्या जाती
वाटाणा पिकाची लागवड ही प्रामुख्याने जुलै महिन्यामध्ये केली जाते. परंतु थंड हवामानामध्ये हे पीक चांगले येते व त्यामुळे महाराष्ट्रात रब्बी हंगामात म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत वाटाणा लागवड केली जाते. रब्बी हंगामासाठी वाटाण्याच्या लागवडीसाठी पुढील जाती फायद्याच्या ठरतात.
1- अरकेल- वाटाण्याचा हा वाण भरघोस उत्पादन देणारा असून याच्या शेंगा आकर्षक गर्द हिरव्या रंगाच्या असतात. या वाणाच्या शेंगा या सहा ते सात सेंटीमीटर लांब असतात. झाडाची उंची जवळपास 40cm पर्यंत असते व लागवडीनंतर साधारणपणे 50 ते 55 दिवसात काढणीस तयार होतो.
2- मिटीओर- या जातीच्या शेंगा देखील रंगाने गर्द हिरव्या असतात व दिसायला आकर्षक असतात. शेंगांची लांबी सहा ते सात सेंटीमीटर पर्यंत असते व झाडाची उंची 40 cm असते व शेंगा लागवडीनंतर 50 ते 55 दिवसांनी काढायला तयार होतात.
3- बोनव्हिला- वाटाण्याची ही जात लागवडीसाठी खूप फायदेशीर असून यापासून भरघोस उत्पादन मिळते. या जातीच्या शेंगा आकर्षक गर्द हिरव्या रंगाच्या असतात व साधारणपणे झाडांची उंची मध्यम स्वरूपाचे असते. साधारणपणे लागवडीनंतर 45 दिवसांनी या जातीच्या शेंगा काढणीस तयार होतात.
4- जवाहर-1- वाटाण्याची ही जात देखील भरघोस उत्पादनासाठी फायद्याची असून या जातीच्या शेंगा फिकट हिरवट रंगाच्या असतात व सहा सेंटीमीटर लांबी असते. लागवड केल्यानंतर 55 दिवसात फुलधारणा होते व 90 दिवसात काढणीस तयार होतो.