मान्सूनचे महाराष्ट्रात आज आगमन झाले. आता पावसाला खऱ्या अर्थाने सुरवात होईल. जिल्ह्यातील काही भागात पावसाने सुरवात देखील केली आहे. त्यामुळे आता शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांनी पाऊस जरी झाला तरी पहिला पंधरवडा पेरणीची घाई न करता योग्य नियोजन व योग्य मशागत केली पाहिजे असे तज्ज्ञ सांगतात.
त्यामुळे कमी- अधिक पर्जन्यमान, दोन पावसातील मोठा खंड अशा काही समस्या निर्माण झाल्यास तोटा कमी होईल. योग्य नियोजन व योग्य मशागतीमुळे खरीप हंगामाचे योग्य नियोजन होईल व कमी खर्चात अधिक व शाश्वत उत्पन्नाची शाश्वती मिळेल.
खरीप हंगामात पिकांचे नियोजन करत असताना त्या भागातील हवामान, जमिनीचा प्रकार, ओलिताची साधने इत्यादींचा विचार करून पिकांची निवड करणे, माती परीक्षण, पूर्वमशागत, सेंद्रिय खतांचा वापर, संकरित तसेच सुधारित वाण, वेळेवर पेरणी, शिफारशीनुसार पेरणीनंतर हेक्टरी झाडांची संख्या, खतांच्या मात्रा, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, तण नियंत्रण, कीड नियंत्रणाकडे लक्ष दिले पाहीजे.
नांगरट, पाळ्या
पिकांच्या पेरणीपूर्वी पूर्वमशागत अत्यंत महत्वाचे असते. यासाठी शेतकऱ्यांनी खोल नांगरट व २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडावीत. त्यामुळे पिकांच्या मुळांची वाढ चांगली होईल. आधीच्या पिकाची धसकटे, पाला व इतर कचरा गोळा करून तो कुजवावा व शेत स्वच्छ ठेवावे. त्यामुळे कीड व रोगांच्या सुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होते. उपलब्धतेप्रमाणे शेणखत टाकले पाहिजे.
माती परीक्षण – काळाची गरज..
माती परीक्षण हा मुद्दा अत्यंत महत्वपूर्ण असा आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी माती परीक्षण करूनच पुढील नियोजजन करणे गरजेचे आहे. माती परीक्षण केल्यास पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी जमिनीची सुपीकता कशा पद्धतीने टिकवावी याचे नियोजन करता येते.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी जमिनीच्या प्रतीचा निर्देशांक माहीत असणे जरुरीचे आहे. त्यानुसार नियोजित पिकाला किती प्रमाणात अन्नद्रव्य द्यायला पाहिजेत याची माहिती कळते. माती परीक्षणावरून जमिनीची आम्लता, विम्लता आणि क्षारांचे प्रमाण कळते. जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.
सरी-वरंबे
मध्यम ते भारी जमिनीत नांगराने उतारास आडवे तास घालावे. त्यामुळे जमिनीत सऱ्या तयार होतात आणि पडणाऱ्या पावसाचे पाणी सऱ्यातून जमिनीत मुरते. सऱ्यांमुळे उताराची लांबी कमी होऊन निरनिराळ्या भागात विभागली जाते. या पद्धतीत ८० टक्के पाणी जमिनीत मुरते. ते वाहून जात नाही. सऱ्यांची लांबी ९० मीटरपर्यंत ठेवावी या पद्धतीमुळे ३५ ते ४० टक्के पीक उत्पादनात वाढ दिसून येते
सपाट वाफे
शेतीत जिथे पाणी मुरण्याचा वेग जास्त आहे आणि जमिनीला फारसा उतार नाही अशा ठिकाणी उताराला आडवे वाफे तयार करावेत. खरीप हंगामात वाफे तयार करताना रिजरने उभे आडवे ६६ मीटर अंतरावर उतारास आडवे वाफे तयार करावेत. वरंब्याची उंची २० ते ३० सेंमी ठेवावी. असे वाफे जागच्या जागी पाणी मुरण्यास मदत करतात.