Farmer Scheme : देशातील शेतकऱ्यांच्या आणि सामान्य जनतेच्या हितार्थ अनेक योजना कार्यान्वित केल्या जातात. केंद्र शासनाच्या माध्यमातून तसेच वेगवेगळ्या राज्यातील राज्य शासनाच्या माध्यमातून जनहित योजना चालवल्या जातात. रुफ टॉप सोलर ही देखील अशीच एक योजना आहे. ही योजना केंद्र पुरस्कृत योजना असून संपूर्ण भारत वर्षात या योजनेचा अंमल सुरू आहे.
याच्या माध्यमातून देशातील सौर ऊर्जेच्या वापराला चालना दिली जात आहे. आता या योजनेची मुदत 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आता उद्दिष्ट साध्य होईपर्यंत अनुदान मिळणार आहे. साहजिकचं यामुळे रूफ-टॉप सोलर बसवू इच्छिणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
दरम्यान नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे एक महत्त्वपूर्ण माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, कोणत्याही विक्रेत्याला ग्राहकांनी सौर रूफटॉप बसवणे हेतू राष्ट्रीय पोर्टलवरील अर्जाच्या शुल्कापोटी कोणतेही अतिरिक्त शुल्क किंवा संबंधित वितरण कंपनीने विहित केलेले नसलेले नेट मीटरिंग / चाचणीसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क देऊ नये.
दरम्यान आता या केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला मुदतवाढ मिळाली असल्याने देशाच्या कोणत्याही राज्यातला ग्राहक या योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी अर्ज करू शकणार आहे. अर्ज केल्यानंतर संबंधित ग्राहकांने अनुदान मिळेपर्यंत याचा मागोवा घेणेदेखील गरजेचे आहे. राष्ट्रीय पोर्टल अंतर्गत सौर रुफ टॉप बसवू इच्छिणाऱ्या ग्राहकांना 14 हजार 588 रुपयांच अनुदान मिळणार आहे.
ग्राहकांना यासाठी संबंधित वितरण कंपनीने नोंदणी केलेल्या कोणत्याही एका विक्रेत्याकडून रुफ टॉप सोलर प्लांट बसवावा लागणार आहे. इतर दुसऱ्या विक्रेत्याकडून घेतलेला सोलर प्लांट योजनेअंतर्गत अनुदानासाठी पात्र राहणार नाही याची काळजी घ्यावी. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. नेट मीटरिंगचे शुल्क देखील संबंधित वितरण कंपन्यानी निर्धारित करून दिले आहे.
यामुळे निर्धारित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारली जाऊ शकत नाही. तसेच ग्राहकांना विक्रेत्याला किंवा वितरण कंपनीला अनुदान प्राप्तीसाठी पैसे देण्याची कोणतीच आवश्यकता नाही. या योजनेच्या माध्यमातून दिलं जाणारा अनुदान हे मंत्रालयाकडून मिळत अन हे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.
याबाबत खुद्द ऊर्जा मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. रुफ टॉप सोलर प्लांट बसवू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी असून या योजनेला मुदतवाढ मिळाली असल्याने सौरऊर्जेचा वापर वाढणार आहे. केंद्र शासन देखील सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी कटिबद्ध असून या अनुषंगाने कायमच शासनाकडून प्रयत्न केले जातात. या योजनेला दिलेली मुदतवाढ हा देखील असाच एक छोटासा प्रयत्न आहे.