कृषी

Farmer Success Story: ‘या’ शेतकऱ्याने 1 एकर कलिंगड लागवडीतून 60 दिवसात मिळवला 2 लाख रुपयांचा निव्वळ नफा! वाचा कसे केले नियोजन?

Published by
Ajay Patil

Farmer Success Story:- शेतकरी आता पारंपारिक पिकांऐवजी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पिकांची लागवड करत असून कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन देऊ शकतील अशा पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचे मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.

कमीत कमी पिकांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर भाजीपाला पिके ही कमीत कमी खर्चात व कमीत कमी कालावधीत चांगला नफा मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे ठरतात व शेतकरी बंधू या पिकांची लागवड देखील मोठ्या प्रमाणावर करत आहेत. अशाच कमीत कमी कालावधीत व कमीत कमी खर्चामध्ये जास्त पैसा मिळवून देणाऱ्या पिकांची यादी पाहिली तर यामध्ये कलिंगड हे पीक खूप महत्त्वाचे आहे.

उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये कलिंगडाला प्रचंड मागणी असल्यामुळे कमीत कमी कालावधीत खूप चांगला पैसा शेतकऱ्यांना या पिकाच्या माध्यमातून मिळू शकतो. याचेच उत्तम उदाहरण आपल्याला आंबेगाव तालुक्यातील वाळुंजनगर येथील दत्तात्रय वाळुंज यांचे घेता येईल. दत्तात्रय वाळुंज यांनी एक एकर क्षेत्रामध्ये कलिंगड लागवड करण्याचा निर्णय घेतला व साठ दिवसांच्या कालावधीत त्यांनी दोन लाख रुपयांचा नफा या माध्यमातून मिळवला.

 दत्तात्रय वाळुंज यांनी साठ दिवसात कलिंगडातून मिळवला दोन लाख रुपयांचा नफा

जर आपण आंबेगाव तालुक्याचा पूर्व भाग पाहिला तर तो तसा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. या दुष्काळी पट्ट्यामध्ये खडकवाडी तसेच वाळूंज नगर व रानमळा इत्यादी गावे येतात. परंतु या ठिकाणी डिंभा उजव्या कालव्यामुळे पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे आता त्या ठिकाणची शेती बागायती झालेली आहे

व त्याचाच फायदा घेत शेतकरी आता विविध पिकांच्या माध्यमातून भरघोस उत्पादन घेऊन लाखोत नफा मिळवत आहेत. याच पाण्याच्या उपलब्धतेचा फायदा घेत वाळुंजनगर येथील दत्तात्रय वाळुंज यांनी एक एकर क्षेत्रामध्ये कलिंगड पीक घेण्याचा निर्णय घेतला.

त्यांची निखिल व प्रशांत या दोन्ही मुलांच्या मदतीने कलिंगड लागवडीसाठी तयारी सुरू केली व एक एकर क्षेत्रात गादीवाफे तयार केले व मल्चिंगचा वापर करून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कलिंगडाच्या तयार रोपांची लागवड केली. एक एकर क्षेत्रामध्ये त्यांना एकूण 6000 कलिंगडाची रोपे लागवडीसाठी लागली व एक रोप त्यांना अडीच रुपये प्रमाणे मिळाले.

 कलिंगड पिकाचे असे केले नियोजन

एक एकर क्षेत्रामध्ये गादीवाफे तयार करून त्यावर मल्चिंग पेपर टाकून जानेवारीच्या चौथ्या आठवड्यामध्ये त्यांनी जवळपास सहा हजार रोपांची लागवड केली. या कलिंगडच्या रोपांना ठिबकच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन केले व पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत करून कमीत कमी पाण्यात लागेल व गरजेनुसार तेवढ्याच पाण्याचा पुरवठा केला.

तसेच कलिंगड पिकाच्या वाढीकरिता आवश्यक असलेली विद्राव्य खते त्यांनी ठिबकच्या माध्यमातून पाण्यातून दिली. उत्तम प्रकारे नियोजन ठेवल्यामुळे अवघ्या साठ दिवसांनी त्यांचे कलिंगड काढणीला आले व काढणीला सुरुवात देखील झाली. योग्य व्यवस्थापन ठेवल्यामुळे त्यांनी त्यांच्या शेतामध्ये पिकवलेल्या एक एक कलिंगडचे वजन तब्बल सहा ते साडेसहा किलो पर्यंत येत आहे.

त्यासोबतच दर्जेदार असे उत्पादन मिळाल्याने व्यापाऱ्यांनी शेताच्या बांधावर येऊन प्रतिकिलो अकरा रुपयाचा दर देऊन कलिंगडाची खरेदी केली व आतापर्यंत या एक एकर क्षेत्रामधून त्यांना 25 टन कलिंगडाचे उत्पादन मिळाले आहे. याकरिता त्यांना 75 हजार रुपये एकूण खर्च आला असून खर्च वजा जाता त्यांना दोन लाख रुपयांचा नफा 60 दिवसात मिळाला आहे.

Ajay Patil