कृषी

Farmer Success Story: खर्च केला सव्वा लाख उत्पन्न मिळणार 7 लाख! सीताफळ बागेत या शेतकऱ्याने काय केले? वाचा माहिती

Published by
Ajay Patil

Farmer Success Story:- शेती पद्धतीत करण्यात आलेला बदल व व्यवस्थित तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी मुळे आता शेती परवडणारी झाली असून तिला व्यावसायिक दृष्टिकोन देखील मिळाला आहे. वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला पिके, फळ पिकांच्या लागवडीतून आता शेतकरी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील चांगले उत्पन्न मिळवत आहेत.

तसेच बरेच शेतकरी हे पारंपारिक पिके घेत असून त्याला आता फळ पिकांची जोड देऊन देखील दुहेरी उत्पन्न मिळवताना आपल्याला दिसून येतात. साधारणपणे योग्य व्यवस्थापन, त्याला तंत्रज्ञानाची जोड आणि बाजारपेठेचा अभ्यास करून केलेले पिकांचे नियोजन खूप फायद्याचे ठरताना दिसून येत आहे.

याच पद्धतीने जर आपण रेनापुर तालुक्यात असलेल्या खानापूर येथील माधव इगे या शेतकऱ्याचा विचार केला तर या शेतकऱ्याने सिताफळ लागवडीच्या माध्यमातून चांगले यश प्राप्त केले आहे. सीताफळाची व्यावसायिक लागवड करून त्यांनी  कमीत कमी खर्चामध्ये चांगला आर्थिक नफा मिळवला आहे.

 सिताफळ उत्पादनातून लाखात नफा

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रेणापूर तालुक्यातील खानापूर येथील शेतकरी माधव इगे यांनी सिताफळ लागवड करून कमी खर्चामध्ये लाखात उत्पन्न मिळवले आहे. पारंपारिक शेतीला फळ शेतीची जोड देत त्यांनी 3 एकर क्षेत्रावर गोल्डन जातीच्या सिताफळाची लागवड केली व त्यासाठी ठिबक चा वापर करण्यात आला आहे.

गेल्या तीन वर्षांमध्ये एका एकर करीता त्यांना जवळपास 40 हजार रुपये खर्च आला. इतर पिकांच्या तुलनेमध्ये सीताफळाला खत तसेच कीटकनाशके व मजुरी कमीत कमी लागत असल्यामुळे बऱ्याच खर्च वाचला. सध्या त्यांच्या शेतातील सीताफळाची काढणी सुरू असून पहिले दोन तोडे झाले असून त्यातून त्यांना दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

सध्या सिताफळाला प्रतिकिलो 145 रुपयांचा दर मिळत असून पहिल्या दोन तोड्यात त्यांना चौदाशे किलो उत्पादन मिळाले असून अजून त्यांना चार ते पाच टन उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सर्व मिळून जर साडेसहा टनापर्यंत त्यांना उत्पादन मिळाले तर सात ते नऊ लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची त्यांना अपेक्षा असून खर्च वजा जाता सात लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांना होईल अशी अपेक्षा आहे.

 सीताफळ बागेत केले या पिकांचे नियोजन

त्यांनी मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये सीताफळाची लागवड केलेली असून तीन एकर क्षेत्रामध्ये त्यांनी संपूर्णपणे ठिबक सिंचनाचे नियोजन करून पाणी व्यवस्थापन केलेले आहे. तीन वर्षा अगोदर त्यांनी सिताफळ लागवड केलेली होती व या पिकासोबतच त्यांनी आंतरपीक म्हणून खरीप हंगामामध्ये सोयाबीन घेतले व रब्बी हंगामामध्ये हरभरा पिकाचे उत्पादन घेऊन दुहेरी उत्पन्न मिळवले.

 त्यांच्या सीताफळ बागेचे अर्थकारण

त्यांचा सिताफळ उत्पन्नाचा हा पहिलाच तोडा असून आतापर्यंत दोन वेळच्या झालेल्या काढणीमध्ये चौदाशे किलो सीताफळाचे उत्पादन मिळाले आहे. सर्व मिळून त्यांना  पाच ते सहा हजार किलो सीताफळाचे उत्पादन मिळण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत त्यांनी लागवड केलेल्या तीन एकर क्षेत्रावरील सीताफळासाठी  फवारणी, रासायनिक खते व इतर खर्च असा एक लाख वीस हजार रुपये खर्च आला आहे. सध्या त्यांनी पिकवलेले सिताफळ ते हैदराबाद येथे विकत असून त्या ठिकाणी त्यांना 145 रुपये प्रति किलोचा दर मिळाला आहे. या सगळ्या उत्पादनातून त्यांना केलेला खर्च वजा करता सात लाख रुपयांचा नफा होण्याची अपेक्षा आहे.

Ajay Patil