Farmer Success Story:- शेतीचे आधुनिक स्वरूप आणि तंत्रज्ञानाचा वापर हे एकमेकांशी निगडित असलेले समीकरण असून शेतीमध्ये आता नव्याने येऊ घातलेल्या उच्चशिक्षित तरुणांमुळे या समीकरणाला मोठ्या प्रमाणावर बळ मिळाले आहे. विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून भाजीपाला पिकांपासून तर वेगवेगळ्या प्रकारच्या फळ पिकांपर्यंत विविध पिकांची लागवड अनेक उच्चशिक्षित तरुण शेतकरी करताहेत.
आताच्या तरुणांचा विचार केला तर शेतीमध्ये प्रामुख्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच फळबागांच्या लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर कल असल्याचे दिसून येते. कारण नोकऱ्यांची उपलब्धता देखील खूप कमी असल्याने आणि इतर व्यवसायांना भांडवलाची कमतरता भासत असल्याने आपल्या शेतीमध्येच विविध प्रयोग करत करिअर म्हणून शेतीची निवड करण्याला प्राधान्य दिले जात आहे.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण साईनगरी शिर्डी येथील सचिन गोंदकर यांचा विचार केला तर या तरुण शेतकऱ्याने दिल्ली या ठिकाणाहून एमएससी ऍग्री व पीएचडी पूर्ण करून नोकरी न करता वडिलोपार्जित असलेल्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेती करण्याचा निर्णय घेतला व त्यामध्ये यश देखील मिळवले. या सचिन गोंदकर यांची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
सिताफळ बागेतून साधली आर्थिक समृद्धी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, साईनगरी शिर्डी येथील सचिन गोंदकर या तरुण शेतकऱ्याची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर त्यांनी एमएससी ऍग्री आणि पीएचडी मध्ये शिक्षण पूर्ण केले. हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना घरच्यांनी त्यांचा वडिलोपार्जित असलेला व्यवसाय लॉजिंग आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्स व त्यासोबत नोकरी करण्याचा सल्ला दिला.
परंतु ॲग्री मध्ये मास्टरी केल्यानंतर त्यांनी या शिक्षणाचा उपयोग घरच्या शेतीमध्ये करण्याचे ठरवले व त्या दृष्टिकोनातून कुठले पीक घेतले तर चांगले उत्पन्न येईल व त्या दृष्टिकोनातून आपल्याला चांगला बाजार भाव मिळेल या सगळ्या दृष्टिकोनातून सखोल अभ्यास केला व आई वडिलांशी चर्चा करून फळबाग शेती करण्यासाठी त्यांनी घरच्यांचा होकार मिळवला.
त्याआधी त्यांनी त्यांच्या शेतातील मातीचे परीक्षण केले व त्या परीक्षणानुसार त्यांच्या शेतात सीताफळ बाग चांगली येऊ शकते हे त्यांना कळले व त्या दृष्टिकोनातून त्यांनी सीताफळ लागवडीचे नियोजन केले.
अशा पद्धतीने केली सीताफळाची लागवड
सिताफळ लागवड करण्याचे निश्चित केल्यानंतर त्यांनी लागवडीसाठी गोल्डन जातीच्या सीताफळाची निवड केली व सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून गोल्डन जातीच्या सीताफळाचे 380 रोपे लागवडीकरिता खरेदी केली. त्यांच्या घरच्या एक एकर जमिनीमध्ये त्यांनी आठ बाय 15 मीटर अंतरावर 2017 मध्ये सिताफळाची लागवड केली व याकरिता संपूर्ण खर्च त्यांना एकरी 40 हजार रुपये आला.
लागवडीनंतर सिताफळापासून उत्पन्न मिळवण्याचा कालावधी हा तीन वर्षाचा असतो. या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी आंतरपीक म्हणून बागेत शेवगा आणि भोपळ्यासारखी आंतरपिके घेऊन चांगले आर्थिक उत्पन्न मिळवले व सिताफळ बागेला जो काही खर्च आला तो या आंतर पिकांपासून जो काही पैसा मिळाला त्यातून वसूल झाला.
सचिन गोंदकर यांच्या सीताफळ शेतीचे आर्थिक गणित
गेल्या वर्षापासून सचिन गोंदकर यांच्या शेतातील सीताफळ उत्पादन द्यायला लागले असून मागच्या वर्षी तीन टन सिताफळांचे उत्पादन निघाले होते व मागच्या वर्षी 70 ते 80 रुपये किलोला दर मिळाला होता. मागच्या वर्षी त्यांना सर्व खर्च वजा करत चार लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला होता.
सीताफळापासून उत्पादन सुरू व्हायला हे दुसरे वर्ष असून यावर्षी देखील दोन ते तीन टन सीताफळाचे उत्पादन निघेल असा त्यांना अंदाज आहे. सचिन यांनी पिकवलेल्या सिताफळाचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या एका फळाचे वजन पाचशे ते सहाशे ग्राम असल्यामुळे थेट गुजरात राज्यातून त्यांनी पिकवलेल्या सीताफळाला खूप चांगली मागणी आली आहे. यावर्षी देखील 60 ते 70 रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे यावर्षी देखील सर्व खर्च वजा जाता तीन ते चार लाख रुपयांचा नफा मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे.
अशा पद्धतीने जर शेतीमध्ये आधुनिकतेची कास धरली व बाजारपेठेचा अभ्यास करून पिकांचे नियोजन केले तर नक्कीच शेतीतून चांगला पैसा मिळू शकतो हे सचिन गोंदकर यांच्या उदाहरणावरून दिसून येते.