कृषी

Farmer Success Story: या शेतकऱ्याने केला धाडसी प्रयोग! ‘अशापद्धती’ने केली या रानभाजीची लागवड व घेतले लाखात उत्पन्न

Published by
Ajay Patil

Farmer Success Story:- प्रयोगशीलता हा जो काही गुण असतो हा प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप फायद्याचा ठरतो व या गुणामुळेच अनेक नवनवीन पद्धती व तंत्रज्ञानाचा शोध लागत असतो. अगदी याच पद्धतीने जर आपण कृषी क्षेत्राचा विचार केला तर आता अनेक शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग शेतीमध्ये निरंतर करत असतात. काही शेतकरी काही फळबागांचे किंवा पिकांचे वान विकसित करण्यामागे 10-10 वर्षापर्यंत ते प्रयोग करत असतात व त्या माध्यमातून यशस्वी देखील होतात.

कुठल्याही गोष्टीवर किंवा कुठल्याही घटकावर प्रयोग करूनच काहीतरी नवीन गोष्ट तयार होत असते हे नक्की. तसेच काही शेतकरी अनेक नवनवीन पद्धतीची पिकांची लागवड करतात व हा देखील एक प्रयोगच असतो. असाच प्रयोग अकोला जिल्ह्यातील एका शेतकरी दांपत्याने केला आहे. जंगली भागामध्ये किंवा शेताच्या शेजारी असलेल्या एखाद्या नाल्याच्या काठावर उगवणाऱ्या कर्टुल्याची लागवड त्यांनी केली व त्या माध्यमातून लाखात उत्पन्न मिळवले आहे.

परंतु ही लागवड करताना त्यांनी ती अतिशय आधुनिक पद्धतीने केली असून  यामध्ये कृषी विभागाचे मार्गदर्शन व युट्युब सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती घेऊन हे पीक यशस्वी केले आहे.

 कर्टुल्याची लागवड करून मिळवले लाखात उत्पन्न

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अकोला जिल्ह्यात असलेल्या धानोरा या गावातील श्रीकृष्ण लांडे व त्यांच्या पत्नी संगीता लांडे  यांनी एक धाडसी प्रयोग केला असून त्यांनी चक्क कर्टुल्याची लागवड केलेली आहे. त्यांच्याकडे एकूण पाच एकर शेती आहे व त्यामध्ये ते अनेक प्रकारचे पारंपारिक पिके घेतात. परंतु अशा पिकांपासून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यामुळे त्यांनी काहीतरी नवीन शेतीमध्ये करावे या दृष्टिकोनातून  मागच्या वर्षी कृषी विभागाच्या मार्गदर्शनावरून आणि युट्युब वरून काही माहिती गोळा केली व पाच गुंठ्या क्षेत्रामध्ये करटोल्याची लागवड केली.

या पाच गुंठा मध्ये देखील त्यांना मागच्या वर्षी चांगले उत्पन्न मिळाले होते व त्यातून प्रेरणा घेत त्यांनी यावर्षी हे क्षेत्र दहा गुंठ्यापर्यंत वाढवले. या पिकाच्या यशस्वीतेसाठी वेलीचे संगोपन करणे खूप महत्त्वाचे असते व त्या दृष्टिकोनातून त्यांनी खूप काळजी घेतली.

 अशा पद्धतीने केले नियोजन

करटोला लागवडीकरिता त्यांनी अगोदर शेतामध्ये 40 फूट अंतरावर सिमेंटचे खांब गाडून घेतले व त्याकरिता त्यांना वीस हजार रुपये खर्च आला. तसेच लागवडीकरिता 16 हजार रुपये किलो प्रमाणे जालना या ठिकाणाहून दोन किलो करटोल्याचे बियाणे आणले व दहा गुंठ्यासाठी एकूण त्यांना 60 हजार रुपये इतका खर्च आला. त्यांनी मे महिन्यामध्ये याची लागवड केली व जून महिन्याच्या अखेरपर्यंत त्यांना उत्पादन मिळायला सुरुवात झाली. जेव्हा उत्पादन सुरू झाले तेव्हा अगोदर तीन ते चार दिवसांच्या आड तोडणी करावी लागत होती व पहिल्या तोड्यात त्यांना 25 ते 30 किलो इतके करटोल्याचे उत्पादन मिळाले.

त्यावेळी त्याचा भाव 250 ते 300 रुपये प्रति किलो प्रमाणे होता. हे दोन महिने कालावधीचे पीक असून या दोन महिन्यात त्यांना 240 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळाला असून सद्यस्थितीला त्यांना दोनशे रुपये किलो पर्यंत भाव मिळत आहे. दहा गुंठे कर्टुल्याची लागवड केली असून घनदाट झुडपे तसेच डोंगरदऱ्यांमध्ये व नाल्याच्या किनारी मोठ्या प्रमाणावर आढळणारे हे पिक सुपीक जमिनीमध्ये लावण्याचा अकोला जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग आहे.

हे दाम्पत्य मिळून सकाळी सहा वाजता शेतात जातात व तोडणी स्वतःच करतात. सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत जवळपास 30 ते 40 किलो पर्यंत करटुले तोडतात. एका तोड्यात 15 ते 30 किलो पर्यंत त्यांना उत्पादन मिळते. याची विक्रेते अकोला किंवा आसपासच्या गावांमध्ये करतात. सुरुवातीला त्यांना 80 ते 100 रुपये पर्यंत बाजार भाव मिळाला व नंतर दोनशे रुपये किलो सरासरीने करटुले विकले गेले. कर्टुले विक्रीसाठी दाखल होताच नागरिकांची खरेदीसाठी प्रचंड झुंबड उडते असे देखील त्यांनी म्हटले व अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये पूर्ण माल विकला जातो.

या पिका विषयी माहिती देताना श्रीकृष्ण लांडे यांनी म्हटले की कुठल्याही प्रकारचे रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर या पिकासाठी केला नसून फक्त सुरुवातीला शेणखताचा वापर करण्यात आलेला आहे. तसेच कर्टुल्याची लागवड केल्यानंतर जमिनीमध्ये कंद तयार होतात व हे कंद वर्षानुवर्ष जमिनीमध्ये तसेच राहतात. त्यामुळे प्रत्येक वर्षी नवीन लागवड करण्याचे गरज भासत नाही व त्यामुळे बियाण्यावरचा खर्च देखील वाचतो. यापुढे त्यांचा मानस आहे की करटूल्यापासून बियाणे तयार करून विक्रीसाठी ते उपलब्ध करणार आहेत.

Ajay Patil