Farmer Success Story:- तरुणाई म्हटले म्हणजे काहीतरी वेगळे करण्याची उर्मी तरुणांमध्ये कायमच दिसून येते. कायम अंगात सळसळणारा उत्साह आणि काहीतरी नवीन करण्याची उर्मी यामुळे अनेक तरुण कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होताना आपल्याला दिसून येतात.
अगदी गेल्या काही वर्षांपासून पाहिले तर अनेक तरुण शेती सारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर येऊ लागले असून त्यामुळे बऱ्याच ठिकाणी शेतीचा चेहरा मोहराच पालटून गेल्याचे सध्या चित्र आहे. कारण आजकालचे तरुण पारंपारिक पिके आणि शेती पद्धती यांना सोडून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून वेगवेगळ्या प्रकारच्या पिके, फळबागांच्या लागवडीतून खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेत आहेत
व त्या माध्यमातून मोठा आर्थिक नफा देखील मिळवताना आपल्याला दिसून येत आहेत. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण नांदेड जिल्ह्यात असलेल्या कंधार तालुक्यातील एका तरुणाचा विचार केला तर या तरुणाने खपली गव्हाची लागवड सेंद्रिय पद्धतीने यशस्वी केली व विषमुक्त शेतीच्या दिशेने एक वाखाणण्याजोगे पाऊल टाकलेले आहे. याच तरुणाची यशोगाथा आपण बघणार आहोत.
कृष्णा भालेराव या तरुण शेतकऱ्याने केली खपली गव्हाची यशस्वी लागवड
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कृष्णा भालेराव हा तरुण शेतकरी मूळचा नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील असून त्याने ॲग्रीमध्ये शिक्षण घेतले आहे व तो परभणी येथील कृषी विद्यापीठातून बीएससी( ॲग्री ) आणि वनस्पती शास्त्र विषयातून एमएससी पूर्ण केलेले आहे.
सध्या बरेच जण आरोग्याच्या बाबतीत जागरूक झालेल्या आहेत व हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेवून कृष्णा भालेराव यांनी सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याने पारंपारिक पिकांना फाटा देत खपली प्रजातीच्या गव्हाची लागवड करण्याचे निश्चित केले. याकरिता त्याने MSCS 2971(T. Dicocum) हे बियाणे उपलब्ध केले.
या गव्हाची पेरणी करण्या अगोदर भालेराव यांनी तीन एकर जमिनीची चांगली मशागत केली व दहा बैलगाडी कुजलेले शेणखत त्या जमिनीमध्ये टाकले तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य, ट्रायकोडर्मासारखे जिवाणू खत व गांडूळ खताचा 50 किलो सोबत एकत्र केले व जमिनीत चांगले मिसळून घेतले.
तसेच या खपली गव्हाच्या बियाण्याला ट्रायकोडर्मा पाच ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करून घेतली व नंतर पेरणी केली. सध्या योग्य व्यवस्थापन केल्यामुळे लागवड केलेला खपली गहू शेतामध्ये बहरला असून लवकरच त्याची काढणी होण्याची अपेक्षा कृष्णा यांना आहे.
जवळपास या तीन एकर क्षेत्रातून खपली गव्हाचे 45 ते 50 क्विंटल उत्पादन मिळेल अशी देखील अपेक्षा त्यांना आहे.
तीन एकरमध्ये किती मिळणार नफा?
जर आपण खपली गव्हाचा विचार केला तर साधारण गव्हापेक्षा त्याला चार पटीने जास्त भाव मिळतो. साधारणपणे दहा हजार रुपये प्रतिक्विंटल दर त्याला मिळतो.
जर आपण या बाजारभावाचा विचार केला तर तीन एकरमध्ये भालेराव यांना 45 ते 50 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांना या गव्हाच्या उत्पादनातून खर्च वजा करता साडेतीन लाख रुपयांचा निव्वळ नफा होईल अशी अपेक्षा आहे.
खपली गव्हाला का असते जास्त मागणी?
हा गहू हृदयविकार तसेच डायबिटीस, आतड्यांचा कॅन्सर, बद्धकोष्ठता तसेच हाडांची झीज भरून काढणारा असून दातांच्या तक्रारी इत्यादीसाठी खूप फायद्याचा मानला जातो. तसेच हा गहू पचायला देखील हलका असतो व शेवया, कूरड्या, खीर, रवा आणि पास्ता इत्यादी पदार्थ बनवण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
या गव्हाची चपाती चवीला इतर गव्हाच्या जातीपेक्षा गुळचट लागते. या गव्हामध्ये 12 ते 15 टक्के प्रथिन, 78 ते 83 टक्के कार्बोहायड्रेट आणि तंतूंचे प्रमाण 16% असते. तसेच या गव्हामध्ये ग्लुटेनची मात्रा अतिशय कमी असते व त्यामुळे डायबिटीस च्या रुग्णांना हा गहू खूप उपयुक्त ठरतो.
खपली गव्हाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा पौष्टिक, वात पित्त शामक आणि शक्ती वाढवणारा आहे. या अशा कारणांमुळे खपली गव्हाला मागणी जास्त असते व दरही जास्त मिळतो.